Saturday 15 December 2018

फिरुनी पुन्हा जन्मेनं मी

#अलक

आज खूप दिवसांनी ती इतकी आनंदित आणि relax मूड मधे होती. मधली काही वर्षे तिच्यासाठी खूपचं कठीण गेली होती.
तिने सावरु म्हणता काहीचं सावरले जात नव्हते. मोताच्या सरातीलं मोती सर तुटल्याने जसे अलगद ओघळतातं तसे एक एक क्षण तिच्या हातूनं निसटतचं गेले होते.
तिला आज का कोणासं ठाऊक तिला पाच सात वर्षापूर्वीची आठवण होतं होती. तेव्हा ती कशी बिधास्त, confident,रोखठोक अन् स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी ...
पण अचानक तो तिच्या आयुष्यात आला अन् सारचं पालटून गेलं. राजबिंडा पिळदार शरीरयष्टी चा तो एका daily soup मधे तिचा प्रियकर होता. त्याच्याबरोबर काम करताना सगळेचं म्हणायचे यांची chemistry खूप छान जुळलेली दिसते screen वर आणि मग हिचं chemistry on screen ची off screen कधी झाली हे तिचे तिलाचं समजले नाही. पण भानावर आली तेव्हा खूप उशीर झाला होता लोक तिला सांगत होते की त्याची अन् तुझी जातकुळी चं वेगळी आहे. कितीतरी जुन्या जाणत्या लोकांनी तिला समजवायचा प्रयत्न केला पण व्यर्थच...
अखेर तिने त्याच्याबरोबर living मधे राहण्याचा निर्णय घेतला.आई वडिलांना हे न पटल्याने तिला तसे माहेर पारखे झाले तिला त्याची पर्वाचं नव्हती ती एका वेगळ्याचं धुंदीत होती.
ज्या daily soup ने हे सारे घडले तो एक सहा महिन्यात संपला. तिला नवीन offers आल्या पण तो मात्र बेकार पडला . अन् empty minds devil's workshop अशी चं त्याची गत झाली तो तिच्यावर संशय घेऊ लागला त्यातचं तिला मातृत्वाची चाहूल लागली तिने त्याच्यामागे आपण कोर्ट मँरेज करुया असा लकडा लावला पण त्याला अडकण्यातं interest नव्हता म्हणून त्याने तिला abortion चा सल्ला दिला.  तिला आता तो खरा कळला होता पण त्याला खूप उशीर झाला होता.त्याचा उत्कृष्ट सल्ला तिला मान्य नव्हता पण नियतीच्या मनात वेगळेचं होते. तिचं miscarriage झाले अन् ती सैरभैर झाली. एक महिनाभर तिने कामही बंद केले अन् जनसंपर्क ही टाळला. परंतु काम नाही केले तर खाणारं काय मग तिने परत काम चालू केले त्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला येतील त्या offers स्वीकारतं गेली अन् स्वतःला कामातं झोकून दिलं जुन्या आठवणी न येण्यासाठी..
अन् आज तिला तिच्या एका नाटकातल्या भूमिकेसाठी सर्वोकृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला होता. तिला तो wish करायला आला म्हणाला झालं गेलं विसरुन जाऊन आपण परत friends होऊया. पण आज ती खूपचं confident होती अगदी पूर्वीसारखी त्यामुळे म्हणाली thanks but it's too late we can't to be friends anymore sorry...
आणि त्यासमोरुनं निघून गेली परत नियतीने दिलेल्या या second innings आनंद लुटण्यासाठी....

मृणाल वाळिंबे

Friday 30 November 2018

बोलावसं वाटलं कधी

बोलावसं वाटलं कधी,
नक्कीच व्हावं व्यक्त...
माणुस मात्र असावा,
अगदी जवळचा फक्त....!!
प्रेम करावं कुणावर,
त्याला सीमाच नसावी....
भावनाच इतकी गोडं,
जी अखंड जपावी...!!
रागही आलाच कधी,
तोही असावा लटका...
फार काळ टिकु नये,
असावा एखादं घटका....!!
शब्दाने शब्द वाढू नये,
कधी ताणू नये जास्त...
बोलून मिटवावं सारं,
हेच सगळ्यात रास्त...!!
कधी लागु देऊ नये,
अबोल्याचं कोंदण...
झालाचं जर कधी,
चुकून एखादं भांडण...!!
मनाने होऊ नये
कधी दूर
जरी असेल काही सल..!!
होऊन जावे  इतके
एकसंध
की होताच येणार
नाही  कधी विलग..!!
असेच जगावे अलवार
अळवावरच्या पाण्यासारखे
अन् करावा सोहळा
येणाऱ्या क्षणांचा
लुटावा आनंद मनमुराद
जगण्याचा...!!

मृणाल वाळिंबे

Saturday 24 November 2018

विजोड जोडपी

# विजोड जोडपी

मधे  मैत्रिणीच्या मुलीसाठी वर संशोधन चालू होते. अर्थातच तिने आम्हा सगळ्या मैत्रिणींना सांगितले की तिच्या (मुलीच्या)काय काय अटी आहेत ते.
तेव्हा ती म्हणाली मुलगी म्हणते मला विजोड नवरा नको.
मला ऐकून नवल वाटले कसं काय एका भेटीत ही मुलगी ठरवणार जोड का विजोड ते. आणि मुळात विजोड कशाला म्हणतात ते कळते का हिला.
पण काय करणार नवीन पिढी! आई वडिलांनीचं डोक्यावर चढवलेली खूप हुशार म्हणून मेरीटने ऍडमिशन मिळवली हो आता लगेचच नोकरी चं starting 45k चं package मिळालं एक सहा महिन्यात US ला जाणार बघा इति आई.
इतकं मिरवलं या बाईने आणि आता डोक्याला हात लावून बसलीय.
मुलीची मतं पराकोटीची पक्की झालीयेत ती काही केल्या बधत नाही. प्रत्येक मुलात खोटं काढते अन् विजोड नकोचं टुमणं लावते.
हे सारे पाहून मन विष्षण होते. काय त्या आई बापांची चूक?
 मुलगी हुशार म्हणून तिचं कौतुक केलं हे चुकलं का छान नोकरी म्हणून तिला प्रोत्साहन दिलं हे चूकलं
खर तरं तिला ती जे विजोड म्हणते त्याचा अर्थचं कळत नाही.
आपली जी जुनी पिढी म्हणजे आजी आजोबा मंडळी त्यांच्या वेळी तर आई वडील सांगतिलं त्याच्या गळ्यात मुलींना माळ घालावी लागे. घरात खंडीभर माणसांचा राबता असे अशात नव ऱ्याच्या अन् आपल्या आवडी निवडी जुळतात का हे बघायला वेळचं नसे.
कुणा बाईला फुलांची कोण आवड  पण नवऱ्याच्या मते चांगल्या बायका डोक्यात अशी सारखी फुले माळत नाहीत. बाई गप्प पण म्हणून काही बिचारी संसार सोडत नव्हती.
थोड्याफार adjustment मधेचं खरी मजा असते प्रत्येक वेळा नवऱ्याने बायको पुढे गुडघे टेकवले पाहिजे असं नाही काही किंवा बाईने नवऱ्यापुढे नाक घासावे असं ही नाही. पण एक नक्की संसारातल्या छोट्याश्या कुरबुरी त ही वेगळचं thrill असतं.
विजोड पणा काय हो जरी आवडी निवडी सवयी नाही जुळल्या तरी एकमेकांच्या आवडी निवडी तरं मोठ्या मनानं जपता येतात ना अन् सवयींच असं असतं की कोणीचं सर्वगुणसंपन्न नसतो त्यामुळे आपल्यातही काही वाईट सवयी असतात ना मग दुसऱ्या च्याचं सवयी highlight करण्यात कसली आहे मजा.
खरं तर ब्रम्हदेवाने बऱ्याचश्या जोड्या या विजोड चं बनवलेल्या असतात कारणं शास्त्रीय दृष्ट्या सुध्दा चुंबकाचे दोन विरुध्द ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात आणि त्याविरुद्ध दोन सारखे ध्रुव एकमेकांपासून बाजूला फेकले जातात.
म्हणूनच विजोड जरी असली जोडपी तरीही त्यांचे संसारही छान होतात.
शेवटी महत्त्वाचे काय मनाच्या तारा एकदा जुळल्या की त्यातून छान प्रेमरुपी सुर बाहेर पडून संसाररुपी गाण्याची धून सर्वदूर पसरत राहते.

मृणाल वाळिंबे

Tuesday 13 November 2018

बालपण

भातुकलीची साथ होती
कागदाची नाव होती
पाण्याने साठलेल्या डबक्याचा
किनारा  होता
मैत्रिणींची संगत होती
खेळण्याची मस्ती होती
मन हे वेडे होते
चिऊ काऊच्या गोष्टीत
रमत होते
कल्पनेच्या दुनियेतच
जगत होते
ना उद्याची चिंता
ना कसली ददात
ना कसली हाव
ना कसला ध्यास
होता तो फक्त
छान निर्व्याज  निर्मळ
भोळा असा तो बाळपणीचा काळ
कुठे आलो आता आपण
या बाजारी अन् समजुतदारीच्या
दुनियेत
बालपण गेले पार हरवून

मृणाल वाळिंबे

Friday 12 October 2018

आज पहाटे फिरायला बाहेर पडले. सर्वत्र धुक्याची चादर पसरल्यासारखी वाटत होती.रस्ता अगदीच धुसर दिसत होता.त्या धुक्याने एक छान गोष्ट शिकवली समोरचा रस्ता दिसत नसेल तर जसे जसे पुढे जाल तसं तसा रस्ता  दिसू लागतो जीवनाचं असचं असतं रस्ता सापडत नसेल तर दूरदृष्टीने प्रयत्न करणं व्यर्थ असते हळूहळू पाऊल टाकत पुढे सरकत जाल तर रस्ता आपोआप मोकळा होत जाऊन आपसूक मार्ग सापडतो.किती मोठे तत्वज्ञान ! नेहमी आपण धुक्याने दिसत नाही म्हणून अडून राहतो त्याच धुक्याला खूपच दूषण देत राहतो परंतु निसर्गातील प्रत्येक बदल माणसाला नवनवीन जीवनाचे पैलू दाखवत असतो. फक्त आपण त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज असते.

शुभ्र धुक्याने मज
पुरतेच वेढले
डोळस असून मज
चाचपडावयास लावले
मंद गती करुन मज
सामोऱ्या रस्त्याचे ज्ञान झाले
धुक्याने मज
जीवनाचे गणित शिकवले
कितीही असू दे मार्ग धुसर
 दुडक्या गतीने टाक पाऊल
मगच होईल रस्ता मोकळा
गवसेल तुस,
 तुजा असा मार्ग वेगळा
तुजा असा मार्ग वेगळा

मृणाल वाळिंबे

Friday 5 October 2018

सध्याच्या गतिमान जगात तसे तर कुणालाच कुणाकडे बघायला वेळ नाही. प्रत्येक जण इतका busy असतो की झोपेतून उठून रात्री झोपस्तवर काय कामं करायची याची एक यादी डोक्यात घोळत असते. त्यामुळे अचानक कोणी तरी कसलेतरी आमंत्रण किंवा इतर काही काम सांगितले की मनुष्य गोंधळात पडतो आणि त्याची चिडचिड सुरू होते. त्या वैतागातूनच एक statement बाहेर येऊ लागते मला वेळचं नाही मी किती busy आहे मला माझाच विचार करायला वेळ नाही वगैरे वगैरे.. आमची आजी लहानपणी म्हणायची "अग बायांनो दिवस कधी मोठा होत नसतो आपणच पहाटे उठावं म्हणजे सगळं बेस होत असतं" आजकाल हे आजीचे शब्द सारखेच कानात घुमतात खर तरं आमची आजी आजकालच्या पिढीच्या दृष्टीने बघितलं तर एक गावंढळ अडाणी बाई पण केवढं अचाट जीवनाचं तत्वज्ञान सांगायची.
हे खरचं आहे दिवसाचे तास वाढत नाहीत कधी. त्यामुळे आपलं schedule दिवसात कसं बसवायचं ते आपणचं ठरवलं पाहिजे.
मला वेळ नाही ही सबब सोडून दिली पाहिजे. इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे मला वेळ कसा काढता येईल याचा विचार केला पाहिजे.
काम हे प्रत्येकाला असलेच पाहिजे नाही तर  त्याची परिस्थिती एखाद्या खटारा गाडीसारखी होईल नुसताच ढाचा बिनकामाचा.  काम करत रहाणे हे जिंवतपणाचे लक्षण आहे. हाताला काम हवे च नाहीतर इंग्रजी तल्या empty mind devil's workshop या म्हणीप्रमाणे परिस्थिती होईल.
काम कराच फक्त त्याबरोबरच आपल्या प्रियजनांनाही थोडासा वेळ द्या.कधीतरी एखाद्या रम्य ठिकाणी फिरायला जा बघा कशा तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात ते अन् मग परत कामाला लागा नव्या जोमाने नव्या जोशाने. तेच तेच काम करून monotonous होण्यापेक्षा कामातून थोडासा वेळ काढून स्वतः चे छंद जोपासा जे ठरेल तुमचे खरेखुरे टॉनिक.
सर्वात महत्त्वाचे आयुष्य खूप सुंदर आहे. काम करणाऱ्या व्यक्ती ला कधीच depression येत नाही म्हणून नेहमी कामात रहा. तुमच्यातल्या creative माणसाला सदैव जागे ठेवा म्हणजे तिच ठरेल तुमची खरी ओळख.
हसत रहा. दुनियेला हसवत रहा. पृथ्वीवर मनुष्य प्राणी म्हणून जन्मला आहात याचा अभिमानच बाळगा. अन् देवाचे आभार माना की त्याने एवढ्या creativity ने मनुष्यास जन्माला घातले.

मृणाल वाळिंबे
कधी कधी हे वेडं मन
काठोकाठं  भरून वाहतं
सुखदु:खाच्या अनुभवांची
आठवण साठवत रहातं
जुन्या क्षणांच्या हिंदोळ्यावर
झुलतचं रहातं
असं हे मनचं कधीतरी
मोकळं करावसं वाटतं
अन्  मगच आठवतं
एक संस्थान  मैत्री नावाचं
जिथे राग लोभ क्षणात
होतो  मोकळा
साठलेल्या दु:खाचा
जिथे होतो निचरा
मनातल्या अलवार भावनांचा
इथेच फुटतो बांध
असचं असतं हे
मैत्री चं झाड
अनामिक ओढीच्या
फांद्यांनी डवरलेलं
असं हे मैत्री चं झाड
प्रत्येकाने लावावं
जिवापलीकडे जपावं
अन्
नात्यापलीकडचं हे नातं
अलवार मनात रुजवावं

मृणाल वाळिंबे




काल whatsapp वर एक पोस्ट वाचनात आली नवरा IT engineer. व  बायको               CA असे दाम्पत्य नवरा अचानक कार accident मधे जातो पण त्याची सारी investment ही एका laptop मधे  गुप्त असते इतकी त्या बायकोला काहीच माहीत नसते. तात्पर्य इतकेच की साऱ्या जुन्या जाणत्या पिढीने याचा सारा दोष हा नवीन technology ला म्हणजेच Internet and online याला देऊन टाकला पण खरं तर हा दोष system चा नसून माणसाच्या       विश्वास र्हतेचा आहे. यावरुनच ही कविता
सुचली

मी तला मी कधी संपतच नाही
मी माझे मला याखेरीज
काही दुसरे सुचतच नाही
मी इतका आत्मकेंद्रित की
आजुबाजूचा समाज
जिवाभावाची माणसे मला
आताशा उमगतच नाहीत
झोपेतून उठून रात्री झोपे पर्यंत
एखाद्या यंत्रवत काम करतो मी
कशासाठी
ऐहिक सुख अन् खूप सारा पैसा
कमविण्यासाठी
अशा मृगजळापाठी धावतो मी
कुणाशी काही share करण्या इतका
वेळच नाही माझ्या शी
अन् मग स्वतःचा ego कुरवाळत
इतरांना तुच्छ लेखत virtual दुनियेत
हरवतो मी
पण अरे वे ड्या अजूनही जागा हो
जिवाभावाच्या माणसांत रम
थोडा पैसा कमी मिळू दे
पण तुझ्या जिवाभावाच्या माणसांच
बक्कळ प्रेम अन् विश्वास मिळव
तिच असेल तुझ्या आयुष्याची खरी पुंजी

मृणाल वाळिंबे

Thursday 4 October 2018

मैत्री

आजतागायत मैत्री या विषयावर खूप लेख वाचले. खूप मैत्रीचे किस्सेही ऐकलेत. म्हणूनच वाटले आपणही मैत्री वर चार ओळी लिहाव्यात. खरं तर मैत्री या शब्दातच खूप सामर्थ्य आहे. दोन माणसांची मैत्री ही स्थळ काळ वेळ किंवा लहान मोठं हे बघून होतच नसते ती होते ती फक्त आणि फक्त त्यांच्यातील एखाद्या समान छंदामुळे, स्वभावातील साम्याने किंवा काही वेळा तर आयुष्यात खालेल्या खस्तांनी सुध्दा.
असो आज मला एक प्रसंग आठवतो आहे याच मैत्रीला धरुनच आहे. तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा मध्यमवयीन साऱ्या लोकांना new generation मुळे facebook आणि whatsapp चे आकलन झाले होते. तेव्हाच पुण्यातील एका मित्राला facebook वर आपले जुने दोन मित्र सापडले. मग दोन सापडल्या वर त्याच्या group मधील बाकी साऱ्या मित्र मैत्रिणींना तो शोधू लागला.जवळ पास सारे सापडले एक मैत्रीण सोडून त्याला खूपच रुखरुख लागली. परंतु तो हटला नाही त्याने या साऱ्याचा एक whatsapp group करुन पूर्वीसारखे वैशाली त भेटायचा प्रस्ताव ठेवला. आता सारेच आयुष्यात स्थिरावल्यामुळे आणि खूप वर्षांनी भेटण्याची उत्कंठा असल्यामुळे सगळे तयार झाले. भेटले त्या दिवशी सर्वांना आपल्या न सापडलेल्या मैत्रिणीची खूप आठवण येत होती. परंतु शाळा सोडल्यापासून ती कोणाच्याच संर्पकात नसल्यामुळे कोणाला तिचे काही च माहीत नव्हते कारण तिचे लग्न झाले असेल नाव बदले असेल तर facebook वर कसे सापडणार. पण जिथे इच्छा जबर असते ना तिथे मार्ग आपसूक सापडतोच. तसेच काही से झाले त्या groupमधील एका मैत्रिणीला कळले की ती पुण्यात च आहे परंतु आजारी आहे. तिला राहवेच ना तिने पत्ता शोधला अन् थेट तिच्या घरीच पोहोचली. तिचा विश्वास च बसेना शाळेत सगळ्या games मधे हिरीरीने पुढे असणाऱ्या आपल्या मैत्रिणी ला असे अंथरुणाला खिळलेले पाहून. नंतर चौकशी अंती कळले की तिचा accident झाला वर्षभरापूर्वी तेव्हापासून ती अशीच आहे. तिने ठरविले आपल्या मैत्रिणीला आपणच साऱ्या मित्र मैत्रिणींनी मिळून बरे करायचे. तिने साऱ्यांना बोलावून सर्व बघितलेले कथन केले आणि म्हणाली आता आपली मैत्रीण परत पूर्वी सारखी आपल्यात आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. चला प्रयत्न करून बघूया. आणि रोज एक एक जण जाऊन तिच्याशी तासभर गप्पा मारु लागले हळूहळू ती बरी होऊ लागली. आणि एक दिवस तिच्या मुलाने फोन केला त्या मैत्रिणी ला म्हणाला मावशी आज आई स्वतः होऊन उठून चालू लागली आणि तिने तुम्हा सगळ्यांना घरी बोलावले आहे.
त्याचे शब्द ऐकून त्या मैत्रिणीचा आनंद गगनात मावेना.तिने पटापटा सगळ्यांना फोन केले. सर्वच खूप आनंदाने तिच्याकडे गेले सगळ्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते आपली मैत्रिण माणसात आली याचा कोण आनंद झाला होता सर्वांना. डॉ क्टर सुध्दा म्हणाले हे काही तरी अर्तक्यचं आहे.खरं तर ही सारी जादू मैत्रीची होती.हीच ताकद आहे खऱ्या निखळ स्वच्छ सुंदर मैत्रीची.

मैत्री एक अनोखं बंधन
जिथे नसतो स्वार्थाचा गंध
असतो तो फक्त अतूट संग
मैत्री एक अतूट नातं
जे तप्त उन्हातही असतं
सावलीसमं
वसंतातल्या गुलमोहरासमं
अलवार फुलणारं
अन् सहवासाच्या चांदण्यात
मनमुराद खुलणारं
मैत्री एक अभेद्य साथं
सदैव मदतीचा हात देणारी
अन् संकटांना सोबतीनं
मात देणारी
मैत्री एक असं घरटं
जिथे मिळे वणव्यातही सहारा
अन् दुर्देवातही थारा
मैत्री एक असं औषध
जे डॉ क्टरांशिवाय मिळतं
अन् जे मनाची कायम किळजी घेतं
मैत्रीसारखी दुसरी देणगी नाही
मनाच्या अलगद कोपऱ्यातील

गुपित उघड करायला
मैत्रीखेरीज दुसरं  हक्काचं स्थानचं नाही
म्हणून च म्हणते
मैत्री एक अनमोल ठेवा
हृदयातून जपण्यासारखा
अन् अंतापर्यंत साथ निभावण्यासारखा

  मृणाल वाळिंबे

Wednesday 3 October 2018

आई आणि मुलगी किती अलौकिक असे नाते. पृथ्वीतलावर जी काही श्रेष्ठ नाती आहेत त्यापैकीच हे एक आहे. प्रत्येक आई आपुलीच छबी आपल्या मुलीमध्ये बघत असते.
आई मुलीचं नातं हे खूप पारदर्शी हळुवार अन् तरल असचं असतं. आई अन् मुलगी यांच्यात एक आश्वासक असा बंध असतो. आईला नेहमीच आपली मुलगी आपल्या पेक्षा सरस व्हावी असेच वाटत असते. त्यामुळे प्रसंगी दटावणारी आईच काही वेळाने तितकीच प्रेमाने मायेने जेव्हा जवळ घेते तेव्हा आपल्याला आभाळं ठेंगण होत.
खर तरं या जगात आई या नात्यासारखं दुसरं नातचं नाही . तिच्या साध्या असण्याने च केवढा आत्मविश्वास प्राप्त होतो. आईला आपली सारीचं पिले सारखी असतात. परंतु जर मुलगी असली तर ती तिच्याकडे जास्त ओढली जाते.
वास्तविक ती स्वतःच्या मुलीकडूनच स्वतःच्या अतृप्त इच्छा आकांक्षा पूर्णत्वाला नेण्याची मनिषा बाळगून असते.दाखल्या दाखल हेच बघा ना बऱ्यादा मुलीला भरतनाट्यम् मध्ये interestनसतो परंतु तिच्या आईला नाचच शिकता आलेला नसतो मग मघा म्हणल्याप्रमाणेच ती आपली ही सुप्त इच्छा मुलीद्वारे पूर्ण करते.
आई मुलीच्या नात्यातला आणि एक पैलू म्हणजे दोघींची एकमेकांना समजू उमजू घेण्याची शक्ती. बरचेदा आई आणि मुलगी यांना न बोलताच एकमेकींच्या मनातलं कळतं अगदी मनकवड्या असल्यासारखं.
असं म्हणतात की आई अन् मुलाची नाळ जोडलेली असते त्यामुळे त्यांना विलग करणे तितके सोपे नसते. म्हणून च जरी मुलीचे लग्न लावून तिला परक्या घरी धाडले तरी ती आपल्या आईला नाही च विसरु शकत. सतत प्रत्येक प्रसंगात तिला आईने काय केले असते हेच आठवत असते म्हणजेच indirectly तिच्या आईचेच संस्कार तिच्याकडून काम करवून घेत असतात.
असं हे आई लेकीचं नातं प्रत्येकीने आपपल्या परीने निभावावं अलगद हळुवारपणे कुठेही राग अन् व्देषाचं गालबोट न लावता.
प्रत्येक मुलीने सुध्दा आपण एक स्त्री आहोत याचा अभिमान बाळगताना आपल्या जन्मदात्या आईला विसरु नये.
या जगात आपण येण्यास आपले जन्मदातेच कारणीभूत आहेत त्यामुळे आपण त्यांच्या या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही म्हणून च त्यांचा जमेल तितका आदरच आपण केला पाहिजे हे विसरून चालणार नाही.

मृणाल वाळिंबे

Tuesday 2 October 2018

आजकाल रोज सकाळी फिरायला जाते तेव्हा काही आजी आजोबा काही मध्यम वयीन बायका बंगल्यातून बाहेर डोकावणाऱ्या फांद्यांची फुले तोडत असतात. हे बघून खूप वाईटच वाटते म्हणजे ते फुले तोडतात म्हणून नाही तर ती एक मानसिकता आहे दुसऱ्याचे ओरबाडायचे. अन् मग हीच फुले आपल्या घरच्या देवाला वाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळवायचे. कसली हीन भावना  आहे ही . देवाला च फुले वाहायची असतील तर फुल पुडा विकत आणा तसेही हाँटेलात जाऊन जेवता तेव्हा खर्च करताच ना मग ज्या देवानेच हे सारे दिले त्यासाठी थोडा खर्च करा कुठे बिघडणार  आहे . पण नाही आम्हाला सवय च लागली आहे दुसऱ्याच्या वस्तूंवर डल्ला मारायचा.
यावरून च लहानपणी ची एक घटना आठवली. मी त्यावेळी आजीकडे राहायला गेले होते. आजीच्या बंगल्याला एक  बाग होती त्यात आजोबांनी खूप सारी फुलझाडे फळझाडे लावली होती. अन् माळी न ठेवता ते स्वतः च त्या बागेची मशागत करत त्यांना पाणी घालण्यापासून ते खत घालणे, औषधांची फवारणी करणे म्हणजे कीड लागू नये म्हणून हे सर्व ते एकटे करत असत.एवढे सगळे करण्यामुळे च सगळ्या झाडांना खूप छान टपोरी फुले येत असत अन् फळांचे तर काय अवीट गोडी असे त्यांना. यात मजा अशी होती की आजोबा या झाडांचे इतके प्रेमाने करायचे की त्यांना अशी बहरलेली बाग बघितली की कोण आनंद व्हायचा. स्वाभाविक च आहे ना ते बागेसाठी इतके झटायचे बागेतल्या झाडांना मुलाप्रमाणे जपायचे. असो ते दिवस आता परत येणार नाहीत. पण काही घटना मात्र हृदया वर कोरल्या जातात ना तशीच ही अगदी कालच घडल्यासारखी डोळ्यासमोर येत रहाते. त्या दिवशी अशाच एक आजी सकाळी सकाळी जुईची फुले त्या वेलीवरून पटापटा तोडत होत्या त्यात कोणी बघितले तर काय ही भिती असल्यामुळे त्या चक्क फुले भसाभसा ओरबाडून आपल्या साडीच्या ओच्यात लपवत होत्या इतक्यात आजोबांना चाहुल लागल्याने ते बाहेर आले तशा लगबगीने आजी सटकू लागल्या तसे आधीच रागाचा पारा चढलेले आजोबा जोरात ओरडले अहो या वयात कसली झाडांची फुले ओरबाडता? त्यावर आजींचे विचार फारच मौलिक होते त्या म्हणाल्या एवढी सारी बाग बहरली आहे कुठे चार फुले घेतली तर बिघडले आणि म्हणाल्या तशीही ही वेल बागेतून बाहेर रस्त्यावर च आली आहे त्याचीच फुले घेतली रस्त्यावर आल्यामुळे ती सार्वजनिक च झाली ना! आता काय बोलणार या वक्तव्यावर. आजोबा हटले नाहीत ते म्हणाले तुम्ही फुले घेतली त पण तुम्हाला माहित आहे का की या बागेतील झाडांना मी प्राणापलिकडे जपतो त्यांची निगा राखतो आणि अशा माझ्या या बछड्यांना तुम्ही धसमुसळेपणाने ओरबाडता तुम्हाला काही वाटत नसेलही पण एक सांगतो की झाडे काही निर्जीव नसतात त्यांनाही मायेचा प्रेमाचा स्पर्श कळतो त्यामुळे इथून पुढे असे निर्दयी पणे वागू नका. कृपा करा. तुम्हाला जर देवासाठी फुले हवी असतील तर मला सांगा मी काढून ठेवत जाईन पण माझ्या या  झाडांना असे डिवचू नका.
आज सकाळी फुले तोडणाऱ्या आजींना पाहून सारखे हेच आजोबांचे शब्द कानात घुमत होते.
खरचं जी माणसे इतकी मनापासून झाडांची अगदी श्रध्देने देवासमं सेवा करतात त्यांच्याच बागा अशा डवरलेल्या असतात मग अशा लोकांना आपण तरी का असे फुले पाने तोडून डिवचावे  बघा करा विचार. ज्या बागेसाठी आपण काहीच करत नाही त्यातील फुलापानांवर आपला
खरचं अधिकार आहे का? विचारा तुमच्या अंर्तमनाला अन् मगच कृती करा.

एक बाग फुलापानांनी डवरलेली
पारिजातकाचा सडा ल्यायलेली
निशिगंधाचा सुवास दरवळणारी
गुलाबाच्या ताटव्यांनी बहरलेली
जाई जुईच्या कमानीने
घराचे प्रवेशद्वार सुशोभित करणारी
अचानक यावे वादळ
अन् क्षणार्धात व्हावे सारे नष्ट
असेचं काहीसे होई
जेंव्हा लोक ओरबाडती
फुले पाने
अरेरे त्यांना जीव आहे रे
त्यांना खुडा हळूच
अलगद अलवार असे
असतील जरी मूक
तरी आहेत तेही भावना मय
नका  देऊ रे त्यांना
अशा यातना
नका  देऊ रे त्यांना
अशा यातना

मृणाल वाळिंबे

Monday 1 October 2018

Short memory



आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस इतका बिझी झाला आहे की त्यास स्वतः कडे लक्ष देण्यास वेळच नाही मग तो इतरत्र काय बघणार?
आज सकाळी morning walk ला एक जुनी शाळेतील मैत्रीण भेटली. अर्थातच खूप वर्षांनी भेटल्यामुळे आम्ही रस्त्याच्या कडेला उभे राहून बोलत होतो जसं पु . ल म्हणतात दोन मुंग्या दोन बायका अन् दोन ट्रक ड्रायव्हर एकमेकांना भेटले की काहीतरी बडबड केल्याशिवाय पुढे जातच नाहीत अगदी तसेच. आजूबाजूनी morning walk ला जाणारे येणारे आमच्या कडे हर तऱ्हेच्या नजरेने कुणी आसूयेने कुणी विस्मयाने असे बघत होते पण आम्ही आमच्याच बालपणीच्या विश्वात रमलो होतो. इतक्या त घड्याळ्याकडे लक्ष गेले अन् फारच उशीर होत असल्याचा संदेश मेंदू देऊ लागला मग गप्पा आवरत्या घेऊन परत एकमेकींना भेटण्याचे ठरवून आम्ही निघालो अन् लक्षात आले आपण एकमेकींचे फोन नंबर च घेतले नाहीत मग पुन्हा हाक मारुन फोन नंबर  exchange चा सोहळा पार पडला. मी असे म्हटले कारण दोघीही आपपले नंबर मोबाईल मधे बघूनच एकमेकींना देत होतो.
किती ही memory ची दुरावस्था. Technology प्रगत झाली पण आमची आठवण्याची कला मात्र अप्रगत झाली. त्यातूनच password ची लिस्ट करा स्वतःचे मोबाईल नंबर बँकेचे अकांऊट नंबर  एकत्र लिहून ठेवा यासारख्या साऱ्या गोष्टी चालू झाल्या.
या सर्वांचे उत्तर मात्र एकच खूप सारी व्यवधाने आहेत वेळच अपुरा पडतो काय काय लक्षात ठेवणार. पण तुमच्या एक लक्षात येत नाही की आपली मागची पिढी सुध्दा खूप काम करायची त्यांच्या वेळेला तर कुठलीही electronic gadgets उपलब्ध नव्हती आता जशी ती "क्या हुकूम है आका" म्हणत २४तास तुमच्या दिमतीला असतात तशी. त्यांच्या कडे एवढे गाडी घोडेही नव्हते की कुठल्याही कामासाठी त्यांना पायपीट च करावी लागायची वेळही जास्त लागायचा पण तरीही त्यांची memory शाबूत रहायची.
आता आपण technology चे गुलाम झालो आहोत त्यामुळे काही अडले की google आलेच मदतीला धावून थोडाही स्मरणशक्ती ला ताण द्यायला आपल्याला जमत नाही.
अरे वेड्यांनो , साधी लोखंडी कढई खूप दिवस वापरली नाही की त्यावर गंज चढतो आपले आता तेच होऊ लागले आहे विचार करायची आठवण्याची शक्ती लोप पावत चालली आहे. आपण वेळ नाही घाई आहे कुठे बुद्धिला ताण द्या म्हणून हा जो सोयीचा अन् आळशी पणाचा मार्ग जोपासत आहोत ना तोच आपला घात करतो आहे. त्यामुळे वेळीच जागे व्हा technology चा वापर करा पण जिथे गरज आहे तिथेच नाही तर एक दिवस स्वतःचे नाव सांगण्यासाठी सुध्दा मोबाईल बघायला लागायची वेळ येईल आपल्यावर.

माणूस आठवणींचा भुकेला
 प्रेमासाठी आसुसलेला
माणूस नवनवीन गोष्टींना
झटक्यात आत्मसात करणारा
माणूस असा प्राणी ज्याला
आहे मन
ज्याला आहेत भावना
ज्याला आहे मेंदू
जुनं साठविण्यासाठी
अन् नवं शिकण्यासाठी
मेंदूचं तर आहे जो
टिकवतोय खरं त्याचं अस्तित्व
जगवतोय मनुष्याला
त्याच्या मनासमं
अन् तोच तर ठरवतोय
त्याचं वेगळेपणं
म्हणूनच म्हणते
स्वतःला न विसरण्यासाठी
थोडी तरी द्या  बुध्दिला चालना
औट घटकेसाठी तरी
तरच वाचवू शकाल स्वतःला
Short memory च्या या विळख्यातून

मृणाल वाळिंबे

Sunday 30 September 2018

पुस्तक वाचता वाचता



हल्ली तसं वाचनाचं प्रमाण कमीच झाले आहे असं साऱ्या जुन्या जाणकार लोकांच मत आहे परंतु तसे नाही नवीन पिढी अगदी जुन्या लोकांसारखी पुस्तकांचे बाड घेऊन नसेल वाचत पण kindle वर  आणि tablet वर बरीच नामांकित लेखकांची पुस्तके ही मुले वाचतात.
मराठी त एक उक्ती आहे वाचाल तर वाचाल म्हणजे तुम्ही जर वाचत रहाल तरच तुम्हाला सामान्य ज्ञान मिळेल जगरहाटी समजेल अन्  या जगात कसं जगायचं ते कळेल म्हणजेच आयुष्याच्या प्रवासात तुम्ही वाईट अन् चुकीच्या गोष्टींपासून वाचाल.
आमच्या लहानपणी शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या कुठे सुवाच्य हस्ताक्षर कुठे निबंध स्पर्धा अशा बऱ्याच अन् या सगळ्यांची बक्षिसे जास्त करून पुस्तके च असायची. मग नवनवीन पुस्तके मिळतात म्हणून आम्ही साऱ्या मैत्रिणी या स्पर्धांमध्ये हिरीरीने भाग घ्यायचो.
लहानपणी या बक्षिस मिळणाऱ्या पुस्तकाचे कोण अप्रूप वाटायचे. मग हळूच त्या नवीन पुस्तकाचा वास घ्यायचा तुम्हाला सांगते तो वास म्हणजे अगदी देव्हाऱ्यात ल्या उदबत्ती सारखा वाटायचा.
नवीन पुस्तक हातात घेतले की पहिल्या पावसाने जसा मातीला गंध येतो अन् एक आल्हाददायक सुवास आसमंतात दरवळतो तशीच काहीशी मनाची अवस्था होई. मेघ दाटून आल्यावर मोर जसा थुईथुई नाचतो तसचं पुस्तक घेऊन घरभर नाचावसं वाटे. नवीन पुस्तक मिळणं म्हणजे मोठं घबाडं गवसण्याइतकचं आनंददायी असे.
खर तरं या साऱ्या झाल्या बालपणी च्या आठवणी. पण अजूनही पुस्तक बघितलं की माझं मन फार तरल होतं ते कधी एकदा घेते अन् वाचते असेच होऊन जाते.
पुस्तका सारखा दुसरा मित्र नाही. तसचं
पुस्तका सारखा दूसरा गुरु ही नाही. बऱ्याचदा आपण दुःखी असतो पण कोणाशी share नाही करु शकत तेव्हा एखादं  हलकफुलकं पुस्तक चं आपल्या मित्राची भूमिका पार पाडतं. आपल्याला सारचं येतं असं नाही पण त्या विषयाच्या पुस्तकानेच आपल्या डोक्यातला गुंता सुटतो म्हणजेच पुस्तकचं वेळेला गुरु सारखं धावून येतं.

पुस्तक म्हणजे नुसती
पाने नाहीत काही
पुस्तक म्हणजे कधी गुरु
तर कधी मित्र
पुस्तक म्हणजे ज्ञानाचे
भांडार
पुस्तक म्हणजे गायकाने
आळवलेला राग
पुस्तक म्हणजे नृत्यांगनेच्या
नाचातील पदलालित्य
पुस्तक म्हणजे एखाद्या सुगरणी ने
केलेला पंचपक्वांनांचा मेवा
पुस्तक म्हणजे देव्हाऱ्यातील
देवाला चढविलेला साज
पुस्तक म्हणजे मनुष्याच्या
जीवनातील अनमोल ठेवा
म्हणून च म्हणते
पुस्तकांना जपा
त्यांना वाचा
अन् त्यांचा सन्मान करा

मृणाल वाळिंबे

Saturday 29 September 2018

मेक युवर वीकनेस अँज अ स्ट्रेंथ

खूप लोकांना आपलेच दुःख कवटाळून मीच कसा या जगातील दुर्दैवी असे म्हणायची सवय असते. खरं तर दुःख प्रत्येकाला च असतं पण काही जण ते दाखवतात तर काही जण त्यातूनच आपला मार्ग काढतात. सर्वात महत्वाचे दुःखानंतर जे सुख मिळते ते फारच अविस्मरणीय असते.
परवा fb वर अशाच एका व्यक्तीविषयी वाचले ज्याला दोन्ही हात नाहीत तरीही तो उत्तम चित्र काढतो तेही पायाच्या अन् तोंडाच्या सहाय्याने. केवढे अफाट आहे हे!
तो त्याचा कुंचला एखाद्या सराईत चित्रकारा इतकाच शिताफीने कधी तोंडाने तर कधी पायाने फिरवत उत्कृष्ट अन् अत्यंत बोलके असे चित्र रेखाटतो.
हा माणूस एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की ज्यांच्या कडे कसली तरी शारीरिक कमतरता असते तरीही ते न डगमगता आपल्या ध्येयाच्या दिशेने चालत राहतात.
आपल्या कमजोरीचा बाऊ न करता तिलाच आपली ताकद बनवतात. हळूहळू लोकही त्यांचे वेगळेपण मान्य करून त्यांना आपल्यात सामावून घेतात. हाच तर खरा त्या व्यक्तींचा सन्मान होय.
म्हणून च माणसाने नेहमी आपल्याकडे जे आहे त्याचा योग्य उपयोग करून घ्यावा अन् जे नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे आहे त्यातच आनंद मानावा. नाहीतर कल्पित अशा मृगजळापाठी धावता धावता कधी दमछाक होऊन आयुष्य मेटाकुटीला येईल ते कळणारच नाही.

देव पण न जाणे
कशी माणसे घडवतो
एखाद्याला खूप सारे देतो
तर दुसऱ्याला मात्र उपाशीच ठेवतो
दात आहेत तर चणे नाहीत
अन् चणे आहेत  तर दातच नाहीत
अशीच गत करतो
पण देवा तुला काय माहित
तूच निर्मिलेला हा मनुष्य प्राणी आहे
बुध्दिमान
तो लढवितो शक्कल
कमजोरीलाच बनवितो ताकद
करतो असाध्यालाही साध्य
मिळवितो खूप सारा सन्मान
जगतो आयुष्य ताठ मानेनं
अन् उजळ माथ्यानं तहहयात

मृणाल वाळिंबे
माणूस हा जसा  बुध्दिवादी प्राणी आहे. तसाच तो भूत भविष्य आणि वर्तमान या साऱ्या काळात गुरफटणाराही आहे.
तसे बघितले तर ह्या तीन काळांना भाषेच्या व्याकरणात अनन्यसाधारण महत्व आहे.
पण मनुष्याच्या बाबतीत मात्र थोडेसे भिन्न आहे.
भूतकाळ म्हणजे घडून गेलेला काळ जो कधीच परत येत नसतो. तरीही मनुष्य त्यातच रमतो अन् जर गतकाळात काही वाईट घडले असेल तर तेच तेच आठवून कुढत बसतो.
भविष्यकाळ म्हणजे येणाऱ्या क्षणांची चाहुल खरं तर तशी ती थोडी फार प्रत्येकालाच होत असते काही जण त्या कडे डोळसपणे पाहतात तर काही जण नजरअंदाज करतात.
वर्तमान काळ म्हणजे सध्याचा चालू काळ.
आजकाल लोकं वर्तमानात जगण्यापेक्षा उद्याचीच चिंता जास्त करतात. भविष्यात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. अशाच अट्टाहासापायी काही लोक मग बुवा बाबा यांच्या मागे लागतात. प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीची तिची अशी एक वेळ असते त्याच वेळेस ती घडत असते तरीही नियती निर्सग यांना डावलून आधीच जाणून घेण्याच्या हट्टामुळे मनुष्य आजचा बहुमूल्य क्षण जगू शकत नाही.
हि फार मोठी शोकांतिका आहे की मनुष्याने एवढी प्रगती केली आहे की तो चंद्रावर जाऊन पोहोचला परंतु पंचमहाभूतांवर तो विजय नाही मिळवू शकत .त्यामुळे च आपण हे मान्य च केले पाहिजे की आपण आपले कर्म करत रहावे भविष्याची काळजी न करता अन् भूतकाळाचं ओझं न बाळगता.

आयुष्य आहे मर्यादित
म्हणून रडण्यापेक्षा
आजचा क्षण जगा
भूतभविष्याची सोडा चिंता
भूतकाळातील आठवणींच्या
हिंदोळ्यावर  होऊ नका स्वार
भविष्याच्या चिंतेने होऊ नका
हवालदिल
वर्तमानातील सुखाचे क्षण
शिका टिपायला
कधी सुखात तर
कधी दुःखात
आयुष्य भरभरून जगत रहा
तुमच्या अस्तित्वाने
माहोल करा प्रफुल्लित
 बघा आयुष्याकडे
सुंदरेतेच्या काचांनी
अन् मिळवा समाधान
या साऱ्या मौलिक क्षण जगण्याचे

मृणाल वाळिंबे

Thursday 27 September 2018

गणेशोत्सव

गणेशोत्सव २ दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी चालू झाली आहे. कोणी घरातच मखर बनवत आहेत तर कोणी विकतच्या मखरांची दुकाने पालथी घालत आहे.
खर तरं आमच्या लहानपणी अशी परिस्थिती नव्हती एवढ्या गणपती सजावटीच्या वस्तूचं नव्हत्या पण सण म्हणून दुसऱ्या गावाला असणारे काका काकू आत्या या साऱ्यांची मात्र रेलचेल असायची. काकू आत्या यांच्या हातच्या नवीन पर्दाथांची लज्जत काही     औरच असायची. तेव्हा वाटायचं हा गणपती सोहळा संपूच नये. छान बोधप्रत असे गणपतीचे देखावे अन् घरचे रोजचे गोडाधोडाचे जेवण यात दहा दिवस कसे संपायचे ते कळायचेच नाही.
लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव त्या वेळच्या इंग्रजी राजवटीला शह देण्यासाठी आपल्या लोकांनी एकत्र यावे अन् समाज प्रबोधन व्हावे यासाठी चालू केला. परंतु हळूहळू त्याला बाजारीकरणाचे स्वरूप येऊन त्याचा विचका झाला. आता तर त्या डीजे च्या वर काही तरी गाणी लावून नाचणे असेच त्याचे स्वरुप झाले आहे.
जर लोकमान्य टिळक स्वर्गातून बघत असतील तर त्यांना खूपच वाईट वाटत असेलं आणि खुद्द गणपती बाप्पा तर आता दहा दिवसाचा वनवास पृथ्वीवर भोगून येतो असेच सांगत असेल पार्वती मातेला.

झुंजूमंजू झाले
कोंबडा आरवला
अन् प्रभाती जाग आली
आळस झटकला
अन् बाप्पाच्या आगमनाची
आठवण झाली
मी म्हणलं बाप्पा
यावर्षी येताना मनाशी
पक्की खूणगाठ ठेव
जिथे जिथे लावतील डीजे
अन् करतील वेडेवाकडे नाचांचे चाळे
तिथे तिथे तू दाखवशील आपुले रौद्र रुप
जिथे होईल मनोभावे पूजा
करतील खरी तुझी आब राखून आरती
तिथे दे तू भक्तांना खराखुरा औआशिर्वाद
आणखी एक सांगते बाप्पा तुला
नवसाच्या नावावर जे बाजार
मांडतात त्यांना खरचंच
एकदा तरी दाखव रे तुझा इंगा
म्हणजेच होईल या साऱ्या
समूळ नाश
अन् होईल खरा गणेशोत्सव
लोकमान्यांना अभिप्रेत असलेला

मृणाल वाळिंबे

Nostalgic आठवणी

जसे जसे आपण मोठे होत जातो तसे तसे खूप साऱ्या गोष्टी मागे पडल्याची जाणीव होऊ लागते. बालपणी केलेली मौजमजा ,उगीच च कुणाची तरी उडवलेली खिल्ली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यावेळी असलेल्या priorities उदाहरण द्यायचे तर साध्या कुणी आलेल्या पाहुण्यांनी दिलेली छोटीशी gift मग ती काही ही असो पण आपल्याला स्वतःला मिळाली याचा आनंदच काही और असे.

आता खूप सारे मुबलक मिळते पण का कोणास ठाऊक लहानपणी कधीतरी मिळणाऱ्या छोट्या श्या गोष्टीचे खूप अप्रूप वाटे.जुने परत कधीच येत नाही हा तर निर्सग  नियमच आहे. हळूहळू वय वाढले की हा सारा निरागस भाव नाहीसा होऊन घाण्याला जुंपलेल्या बैलाची अवस्था होते. कधी कुटुंब साठी कधी स्वतःच्या करिअर साठी आपण धावत राहतो. या धावण्यात इतकी दमछाक होते की आपल्यातील लहान मुलं कुठल्या कुठे पळून जाते अन् उरते ते फक्त यंत्रवत शरीर मन भावना बोथट झालेले असे.
खर तरं ही सारी जगरहाटीचं आहे. परंतु आपणच थोडे बदलावयास हवे. काम करावे पण इतकेही नको की स्वतःच्या गरजांचाच विसर पडले. कधीतरी आपल्या मधे लपलेल्या त्या छोट्या मुलाला जागे करावे अन् त्याला मनसोक्त बागडू द्यावे. बघा किती मनःशांती मिळते ती.

सारा पसारा सावरता सावरता
खूप दूर निघून आले
आताशा वाटे मज
व्हावे लहानगे
वेचाव्या चिंचा बोरे
करावी धमाल मस्ती
अगदी बालपणी सारखीचं
या साऱ्या कामाचा
 व्याप सारावा बाजूला
हुंदडावे मनसोक्त
मन मानेल तसे
करावा सोहळा या
चोरलेल्या क्षणांचा
अन् मिळवावा खरा
आत्मिक आनंद
या दुनियेत जगण्याचा
तरचं होईल खरं
या जीवनाचं सार्थक
मिळेलं अलौकिक असं
सुखं समाधान

मृणाल वाळिंबे

Wednesday 26 September 2018

अनलिमिटेड


Whatsapp वर एक कविता वाचनात आली अनलिमिटेड. खूप उत्सुकतेने मी ती वाचली त्यातील खूप गोष्टी मनाला भावल्या. त्यातूनच ही पोस्ट लिहिण्याची उर्मी मनात आली.

खर तरं आमच्या वेळी (असं म्हणलं की आजी आजोबांच्या पिढीची प्रर्कषाने आठवण येते) जग इतकं जवळ आलेलं नव्हतं एवढी सारी माहिती मिळवण्याची साधनेही नव्हती इतकी सुबत्ताही नव्हती त्यामुळे च की काय साऱ्याच गोष्टी लिमिटेड च होत्या. अनलिमिटेड शब्दच सहसा ऐकिवात येत नव्हता.

साधाच उदाहरण घ्यायचं झालं तर दूरचित्रवाणी वर सुध्दा इतकी सारी भरमसाठ channels नव्हती त्यामुळे तो सगळ्यांनी एकत्र बसूनच बघितला जायचा अन् त्यातच खूप मज्जा यायची. आताश्या एवढ्या साऱ्या channel मूळे खूप सारे options तयार होतात त्यामुळे प्रत्येक खोलीत tv दिसू लागले आहेत. म्हणून च लहान मुले इतकी tv पाहतात त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर अन् एकूणच तब्बेतीवर होतो आहे.

खूप साऱ्या अमर्याद गाड्यांमुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत अन् परिणामी रोजरोज वाहतूक कोंडीला देताना मनुष्याची सगळी शक्ती खर्ची पडत आहे.

आपलं मूल सर्वात पारंगत पाहिजे या अट्टाहासापायी त्याला  सर्वच क्षेत्रातील क्लास लाऊन त्याची इतकी मुस्कटदाबी केली जाते की त्या मुलाला स्वतःला आपण नक्की कशात निपुण व्हावे हेच कळत नाही अन् त्याची अवस्था 'एक ना धड भाराभर चिंध्या' या मराठी म्हणी सारखी होते आहे.

परवा माझ्या एका क्लासच्या मुलाला मी एक प्रश्न विचारला तर तो म्हणाला  आमच्या अभ्यासात नाही मी म्हणाले मागच्याच वर्षी हे होऊन गेले आहे कसे येत नाही? त्यावर तो म्हणाला मँडम google वर search केले की सगळेचं सापडते कशाला हे सारे लक्षात ठेऊन डोक्याची भेंडी करायची. मी निःशब्द काय बोलणार या अर्तक्य logic बद्दल

 म्हणून च वाटते खरचं पूर्वी होते ना तेच बरे होते सर्व कसे लिमिटेड असल्यामुळे हातपाय पसरायचा प्रश्नच नव्हता मुळी

 काळ बदलला
खूप सारे मागे टाकून
प्रगती पथावर चालला
जग जवळ आले
अन् मनुष्य मात्र दुरावला
दुनियेला कवेत घेता घेता
स्वतःहाचे अस्तित्व मात्र
हरवून बसला
खूप साऱ्या अनलिमिटेड ला
कवटाळताना
लिमिटेड अशा नात्यांना मात्र
पारखा झाला
Facebook whatsapp या
Virtual media वर संवाद
साधता साधता
स्वतःचा स्वःताशी संवादच
खुंटला
जगातल्या साऱ्या अनलिमिटेड
गोष्टींना घाला गवसणी
मात्र लिमिटेड आयुष्यातच

मृणाल वाळिंबे

नातं


आजकाल पेपर बघितला की मनावर एका मागून एक आघात होतात. कुठे कुणी कुणावर बलात्कार केला कुठे इस्टेट मिळवण्यासाठी भावानेच भावाचा काटा काढला घटस्पोटाची एक तरी घटना असतेच. किती भयंकर आहे हे अमानवी अमानुष असे. खरचं आपली एवढी नीतीमूल्ये बदलली आहेत की चांगल्या वाईटातला फरकच दिसत नाही. आपल्या भावना एवढ्या बोथट झाल्या आहेत की बऱ्या वाईटाची चाडच राहिली नाही. ज्या समाजात आपण राहतो त्या चे काही तरी ऋण आपल्यावर आहेत हेच आपण सोयीस्कर पणे विसरलो आहोत का?

खर तरं नातं हा दोन अक्षरीच शब्द परंतु खूप मोठा अर्थ दडला आहे त्यात. कुठल्याही दोन व्यक्ती चं नातं जुळण्यासाठी रक्ताची गरज नसते तर विचार आचार जुळण्याची जास्त गरज असते.नातं मग ते नवरा बायको चं असू दे नाही तर सासू सुनेचं नणंद भावजयीचं असू दे. ते जुळण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो निर्सग चा नियमच आहे कुठलीही गोष्ट आपसूक एका सेंकदात तयार होतं नाही तसचं नात्याचं असतं.
आपण जेव्हा नवीन झाडं लावतो तेव्हा त्याला त्या नव्या कुंडीतल्या मातीत रूजण्यासाठी थोडे दिवस जाऊ देतोच ना फक्त पाणी घालत राहतो की जेणेकरुन त्याने या नव्या हवेत नव्या वातावरणात घट्ट मुळे रोवावीत म्हणून. नात्याचं ही असचं असतं हळुवार अलगद असं ते उलगडत जातं मग आपसूकच त्याची घट्ट वीण होते.
पण या साऱ्या process ला जो वेळ द्यावा लागतो ना तोच आजकाल नाहीसा  झाला आहे. Ready to eat च्या या जमान्यात
सगळं लगेचच हवे आहे त्यासाठी द्यावा लागणारा वेळ अन् patience मुळी लुप्त पावत चालला आहे. याचेच पर्यवसान मग नाती नाहीशी होण्यात होत आहे.
मला वाटते नवी पिढी खरं तर खूप हुशार आहे. त्यांच्याकडे ज्ञानाचे भांडार आहे. नाही आहे तो patience तो जर त्यांनी आत्मसात केला तर त्यांना नाती जपा असे सल्लेच द्यावे लागणार नाहीत.

नातं कुठलही असो
रक्ताचं वा मैत्रीचं
ते तेव्हाचं बहरतं
जेव्हा त्याला समजुतीचं
कोंदण मिळतं
नात्याचा पोतं असा असावा
की जोअलवार उलगडला
तर घबाडं गवसावं
नातं असं असावं
अगदी घट्ट वीणीने गुंफलेलं
नात्यात नसावा मीपणाचा
अहंकार
असावा फक्त आपलेपणाचा
आश्वासक हुंकार
म्हणूनच म्हणते
शिका नाती जोडायला
 ती निभावायला
करा प्रयत्नांची पराकाष्ठा
अन् करा सोहळा
नात्यांच्या जडणघडणीचा

मृणाल वाळिंबे

तफावत


दोन दिवसापूर्वी दळण आणायला गेले होते.अर्थातच दळण गिरणीत ठेवून परत आणायला जायचा फारसा उत्साह नव्हता म्हणून तेथेच थांबले. तेवढ्यात एक शाळकरी मुलगा आला मला वाटले आई बहीण कोणीतरी दळण ठेवून गेले असेल अन् तो घ्यायला आला असेल पण तसे नव्हतेच . गिरणीवाल्या दादांनी त्याला नीट चाळून घ्यायला सांग रे घरी म्हणल्यावर मी कान टवकारले माझी थोडी उत्सुकताही चाळवली गेली. मग मी विचारले दादांना काय प्रकार आहे. त्यांनी जे सांगितले ते ऐकून पोटात गलबले. ते म्हणाले त्याची आई धुणीभांडी करते पण पैसे पुरत नाहीत  त्याचा बाप फक्त दारूच पितो अन् काही च काम करत नाही त्या बाईला मुलाला शिकवायचे आहे म्हणून ती बिचारी पै पै जोडते आहे. तिनेच मला सांगितले गिरणीच्या चाकात जो चाळ राहतो सर्व दळणांचा तो देत जा म्हणजे या पोरांची पोटं तरी भागतील. ऐकून खूप वाईट वाटले.
त्याच दिवशी संध्याकाळी हाँटेलात जाण्याचा योग आला.योगायोगाने आमच्याच शेजारच्या टेबलवर एक चौकोनी सुखवस्तु कुटुंब बसले होते. दोन लहान मुले आईवडीलांसमोर  एक एक पर्दाथांची फर्माईश करत होते आईवडील बऱ्यापैकी त्यांची आवड जपत होते परंतु अचानक माझे लक्ष गेले तर त्या मुलांनी एवढे अन्न वाया घालवले होते पण आई वडिलांना त्याचे काही सोयरसुतक आहे असे त्यांच्या कडे बघून वाटत च नव्हते याचे खूपच वाईट वाटले.
केवढा हा विरोधाभास एक बाई आपल्या मुलांना खायला मिळावे म्हणून स्वतः ला विसरुन काबाडकष्ट करते आणि दुसरीकडे एवढी सुबत्ता की त्या मुलांनी वाया घालवलेल्या अन्नाचे काही च वाटत नाही.
शेवटी काय ही सारी जगरहाटी आहे. ज्यांच्याकडे आहे ते वाढतच आहे परंतु त्याबरोबरच उन्मत्त पणाही वाढत आहे. ज्यांकडे नाही त्यांची कीव करण्यापेक्षा त्यांना काही तरी आपण मदत करु शकलो तर खरचं ही तफावत थोडी तरी कमी होईल. बघा थोडासा विचार करा ज्या समाजात आपण राहतो त्याचे थोडे तरी ऋण फेडण्याचा .

नाणं म्हणलं की
दोन बाजू आल्या
कधी चीत तर
कधी पड
एक गरीब आई सांगे
पिलास
मी देईन तुझी साथ
जीवात जीव असस्तोवर
तर दुसरी धनवान आई म्हणे
नकोस घाबरु सोडवीन मी
तुला पदोपदी
हाती पैसा असस्तोवर
खरचं रे ही प्रगती
काय कामाची
जिथे असे ही तफावत सारी
जिथे दिसे फक्त अन्
फक्त स्वतःचीच उन्नती
नसे तमा आजूबाजूच्या
समाजाची
अरे वेड्यांनो आता तरी
व्हा जागे
या साऱ्या क्षणभंगुर मायाजालाला
द्या झुगारून
 करा थोडेसे सत्पात्री दान
 मिळावा आनंद देण्यातला
अन् लुटा समाधान आयुष्यभराचे

मृणाल वाळिंबे
बोलावसं वाटलं कधी,
नक्कीच व्हावं व्यक्त...
माणुस मात्र असावा,
अगदी जवळचा फक्त....!!
प्रेम करावं कुणावर,
त्याला सीमाच नसावी....
भावनाच इतकी गोडं,
जी अखंड जपावी...!!
रागही आलाच कधी,
तोही असावा लटका...
फार काळ टिकु नये,
असावा एखादं घटका....!!
शब्दाने शब्द वाढू नये,
कधी ताणू नये जास्त...
बोलून मिटवावं सारं,
हेच सगळ्यात रास्त...!!
कधी लागु देऊ नये,
अबोल्याचं कोंदण...
झालाचं जर कधी,
चुकून एखादं भांडण...!!
मनाने होऊ नये
कधी दूर
जरी असेल काही सल..!!
होऊन जावे  इतके
एकसंध
की होताच येणार
नाही  कधी विलग..!!
असेच जगावे अलवार
अळवावरच्या पाण्यासारखे
अन् करावा सोहळा
येणाऱ्या क्षणांचा
लुटावा आनंद मनमुराद
जगण्याचा...!!

मृणाल वाळिंबे