Tuesday 2 October 2018

आजकाल रोज सकाळी फिरायला जाते तेव्हा काही आजी आजोबा काही मध्यम वयीन बायका बंगल्यातून बाहेर डोकावणाऱ्या फांद्यांची फुले तोडत असतात. हे बघून खूप वाईटच वाटते म्हणजे ते फुले तोडतात म्हणून नाही तर ती एक मानसिकता आहे दुसऱ्याचे ओरबाडायचे. अन् मग हीच फुले आपल्या घरच्या देवाला वाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळवायचे. कसली हीन भावना  आहे ही . देवाला च फुले वाहायची असतील तर फुल पुडा विकत आणा तसेही हाँटेलात जाऊन जेवता तेव्हा खर्च करताच ना मग ज्या देवानेच हे सारे दिले त्यासाठी थोडा खर्च करा कुठे बिघडणार  आहे . पण नाही आम्हाला सवय च लागली आहे दुसऱ्याच्या वस्तूंवर डल्ला मारायचा.
यावरून च लहानपणी ची एक घटना आठवली. मी त्यावेळी आजीकडे राहायला गेले होते. आजीच्या बंगल्याला एक  बाग होती त्यात आजोबांनी खूप सारी फुलझाडे फळझाडे लावली होती. अन् माळी न ठेवता ते स्वतः च त्या बागेची मशागत करत त्यांना पाणी घालण्यापासून ते खत घालणे, औषधांची फवारणी करणे म्हणजे कीड लागू नये म्हणून हे सर्व ते एकटे करत असत.एवढे सगळे करण्यामुळे च सगळ्या झाडांना खूप छान टपोरी फुले येत असत अन् फळांचे तर काय अवीट गोडी असे त्यांना. यात मजा अशी होती की आजोबा या झाडांचे इतके प्रेमाने करायचे की त्यांना अशी बहरलेली बाग बघितली की कोण आनंद व्हायचा. स्वाभाविक च आहे ना ते बागेसाठी इतके झटायचे बागेतल्या झाडांना मुलाप्रमाणे जपायचे. असो ते दिवस आता परत येणार नाहीत. पण काही घटना मात्र हृदया वर कोरल्या जातात ना तशीच ही अगदी कालच घडल्यासारखी डोळ्यासमोर येत रहाते. त्या दिवशी अशाच एक आजी सकाळी सकाळी जुईची फुले त्या वेलीवरून पटापटा तोडत होत्या त्यात कोणी बघितले तर काय ही भिती असल्यामुळे त्या चक्क फुले भसाभसा ओरबाडून आपल्या साडीच्या ओच्यात लपवत होत्या इतक्यात आजोबांना चाहुल लागल्याने ते बाहेर आले तशा लगबगीने आजी सटकू लागल्या तसे आधीच रागाचा पारा चढलेले आजोबा जोरात ओरडले अहो या वयात कसली झाडांची फुले ओरबाडता? त्यावर आजींचे विचार फारच मौलिक होते त्या म्हणाल्या एवढी सारी बाग बहरली आहे कुठे चार फुले घेतली तर बिघडले आणि म्हणाल्या तशीही ही वेल बागेतून बाहेर रस्त्यावर च आली आहे त्याचीच फुले घेतली रस्त्यावर आल्यामुळे ती सार्वजनिक च झाली ना! आता काय बोलणार या वक्तव्यावर. आजोबा हटले नाहीत ते म्हणाले तुम्ही फुले घेतली त पण तुम्हाला माहित आहे का की या बागेतील झाडांना मी प्राणापलिकडे जपतो त्यांची निगा राखतो आणि अशा माझ्या या बछड्यांना तुम्ही धसमुसळेपणाने ओरबाडता तुम्हाला काही वाटत नसेलही पण एक सांगतो की झाडे काही निर्जीव नसतात त्यांनाही मायेचा प्रेमाचा स्पर्श कळतो त्यामुळे इथून पुढे असे निर्दयी पणे वागू नका. कृपा करा. तुम्हाला जर देवासाठी फुले हवी असतील तर मला सांगा मी काढून ठेवत जाईन पण माझ्या या  झाडांना असे डिवचू नका.
आज सकाळी फुले तोडणाऱ्या आजींना पाहून सारखे हेच आजोबांचे शब्द कानात घुमत होते.
खरचं जी माणसे इतकी मनापासून झाडांची अगदी श्रध्देने देवासमं सेवा करतात त्यांच्याच बागा अशा डवरलेल्या असतात मग अशा लोकांना आपण तरी का असे फुले पाने तोडून डिवचावे  बघा करा विचार. ज्या बागेसाठी आपण काहीच करत नाही त्यातील फुलापानांवर आपला
खरचं अधिकार आहे का? विचारा तुमच्या अंर्तमनाला अन् मगच कृती करा.

एक बाग फुलापानांनी डवरलेली
पारिजातकाचा सडा ल्यायलेली
निशिगंधाचा सुवास दरवळणारी
गुलाबाच्या ताटव्यांनी बहरलेली
जाई जुईच्या कमानीने
घराचे प्रवेशद्वार सुशोभित करणारी
अचानक यावे वादळ
अन् क्षणार्धात व्हावे सारे नष्ट
असेचं काहीसे होई
जेंव्हा लोक ओरबाडती
फुले पाने
अरेरे त्यांना जीव आहे रे
त्यांना खुडा हळूच
अलगद अलवार असे
असतील जरी मूक
तरी आहेत तेही भावना मय
नका  देऊ रे त्यांना
अशा यातना
नका  देऊ रे त्यांना
अशा यातना

मृणाल वाळिंबे

No comments:

Post a Comment