Wednesday, 26 September 2018

तफावत


दोन दिवसापूर्वी दळण आणायला गेले होते.अर्थातच दळण गिरणीत ठेवून परत आणायला जायचा फारसा उत्साह नव्हता म्हणून तेथेच थांबले. तेवढ्यात एक शाळकरी मुलगा आला मला वाटले आई बहीण कोणीतरी दळण ठेवून गेले असेल अन् तो घ्यायला आला असेल पण तसे नव्हतेच . गिरणीवाल्या दादांनी त्याला नीट चाळून घ्यायला सांग रे घरी म्हणल्यावर मी कान टवकारले माझी थोडी उत्सुकताही चाळवली गेली. मग मी विचारले दादांना काय प्रकार आहे. त्यांनी जे सांगितले ते ऐकून पोटात गलबले. ते म्हणाले त्याची आई धुणीभांडी करते पण पैसे पुरत नाहीत  त्याचा बाप फक्त दारूच पितो अन् काही च काम करत नाही त्या बाईला मुलाला शिकवायचे आहे म्हणून ती बिचारी पै पै जोडते आहे. तिनेच मला सांगितले गिरणीच्या चाकात जो चाळ राहतो सर्व दळणांचा तो देत जा म्हणजे या पोरांची पोटं तरी भागतील. ऐकून खूप वाईट वाटले.
त्याच दिवशी संध्याकाळी हाँटेलात जाण्याचा योग आला.योगायोगाने आमच्याच शेजारच्या टेबलवर एक चौकोनी सुखवस्तु कुटुंब बसले होते. दोन लहान मुले आईवडीलांसमोर  एक एक पर्दाथांची फर्माईश करत होते आईवडील बऱ्यापैकी त्यांची आवड जपत होते परंतु अचानक माझे लक्ष गेले तर त्या मुलांनी एवढे अन्न वाया घालवले होते पण आई वडिलांना त्याचे काही सोयरसुतक आहे असे त्यांच्या कडे बघून वाटत च नव्हते याचे खूपच वाईट वाटले.
केवढा हा विरोधाभास एक बाई आपल्या मुलांना खायला मिळावे म्हणून स्वतः ला विसरुन काबाडकष्ट करते आणि दुसरीकडे एवढी सुबत्ता की त्या मुलांनी वाया घालवलेल्या अन्नाचे काही च वाटत नाही.
शेवटी काय ही सारी जगरहाटी आहे. ज्यांच्याकडे आहे ते वाढतच आहे परंतु त्याबरोबरच उन्मत्त पणाही वाढत आहे. ज्यांकडे नाही त्यांची कीव करण्यापेक्षा त्यांना काही तरी आपण मदत करु शकलो तर खरचं ही तफावत थोडी तरी कमी होईल. बघा थोडासा विचार करा ज्या समाजात आपण राहतो त्याचे थोडे तरी ऋण फेडण्याचा .

नाणं म्हणलं की
दोन बाजू आल्या
कधी चीत तर
कधी पड
एक गरीब आई सांगे
पिलास
मी देईन तुझी साथ
जीवात जीव असस्तोवर
तर दुसरी धनवान आई म्हणे
नकोस घाबरु सोडवीन मी
तुला पदोपदी
हाती पैसा असस्तोवर
खरचं रे ही प्रगती
काय कामाची
जिथे असे ही तफावत सारी
जिथे दिसे फक्त अन्
फक्त स्वतःचीच उन्नती
नसे तमा आजूबाजूच्या
समाजाची
अरे वेड्यांनो आता तरी
व्हा जागे
या साऱ्या क्षणभंगुर मायाजालाला
द्या झुगारून
 करा थोडेसे सत्पात्री दान
 मिळावा आनंद देण्यातला
अन् लुटा समाधान आयुष्यभराचे

मृणाल वाळिंबे

No comments:

Post a Comment