Sunday, 30 September 2018

पुस्तक वाचता वाचता



हल्ली तसं वाचनाचं प्रमाण कमीच झाले आहे असं साऱ्या जुन्या जाणकार लोकांच मत आहे परंतु तसे नाही नवीन पिढी अगदी जुन्या लोकांसारखी पुस्तकांचे बाड घेऊन नसेल वाचत पण kindle वर  आणि tablet वर बरीच नामांकित लेखकांची पुस्तके ही मुले वाचतात.
मराठी त एक उक्ती आहे वाचाल तर वाचाल म्हणजे तुम्ही जर वाचत रहाल तरच तुम्हाला सामान्य ज्ञान मिळेल जगरहाटी समजेल अन्  या जगात कसं जगायचं ते कळेल म्हणजेच आयुष्याच्या प्रवासात तुम्ही वाईट अन् चुकीच्या गोष्टींपासून वाचाल.
आमच्या लहानपणी शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या कुठे सुवाच्य हस्ताक्षर कुठे निबंध स्पर्धा अशा बऱ्याच अन् या सगळ्यांची बक्षिसे जास्त करून पुस्तके च असायची. मग नवनवीन पुस्तके मिळतात म्हणून आम्ही साऱ्या मैत्रिणी या स्पर्धांमध्ये हिरीरीने भाग घ्यायचो.
लहानपणी या बक्षिस मिळणाऱ्या पुस्तकाचे कोण अप्रूप वाटायचे. मग हळूच त्या नवीन पुस्तकाचा वास घ्यायचा तुम्हाला सांगते तो वास म्हणजे अगदी देव्हाऱ्यात ल्या उदबत्ती सारखा वाटायचा.
नवीन पुस्तक हातात घेतले की पहिल्या पावसाने जसा मातीला गंध येतो अन् एक आल्हाददायक सुवास आसमंतात दरवळतो तशीच काहीशी मनाची अवस्था होई. मेघ दाटून आल्यावर मोर जसा थुईथुई नाचतो तसचं पुस्तक घेऊन घरभर नाचावसं वाटे. नवीन पुस्तक मिळणं म्हणजे मोठं घबाडं गवसण्याइतकचं आनंददायी असे.
खर तरं या साऱ्या झाल्या बालपणी च्या आठवणी. पण अजूनही पुस्तक बघितलं की माझं मन फार तरल होतं ते कधी एकदा घेते अन् वाचते असेच होऊन जाते.
पुस्तका सारखा दुसरा मित्र नाही. तसचं
पुस्तका सारखा दूसरा गुरु ही नाही. बऱ्याचदा आपण दुःखी असतो पण कोणाशी share नाही करु शकत तेव्हा एखादं  हलकफुलकं पुस्तक चं आपल्या मित्राची भूमिका पार पाडतं. आपल्याला सारचं येतं असं नाही पण त्या विषयाच्या पुस्तकानेच आपल्या डोक्यातला गुंता सुटतो म्हणजेच पुस्तकचं वेळेला गुरु सारखं धावून येतं.

पुस्तक म्हणजे नुसती
पाने नाहीत काही
पुस्तक म्हणजे कधी गुरु
तर कधी मित्र
पुस्तक म्हणजे ज्ञानाचे
भांडार
पुस्तक म्हणजे गायकाने
आळवलेला राग
पुस्तक म्हणजे नृत्यांगनेच्या
नाचातील पदलालित्य
पुस्तक म्हणजे एखाद्या सुगरणी ने
केलेला पंचपक्वांनांचा मेवा
पुस्तक म्हणजे देव्हाऱ्यातील
देवाला चढविलेला साज
पुस्तक म्हणजे मनुष्याच्या
जीवनातील अनमोल ठेवा
म्हणून च म्हणते
पुस्तकांना जपा
त्यांना वाचा
अन् त्यांचा सन्मान करा

मृणाल वाळिंबे

Saturday, 29 September 2018

मेक युवर वीकनेस अँज अ स्ट्रेंथ

खूप लोकांना आपलेच दुःख कवटाळून मीच कसा या जगातील दुर्दैवी असे म्हणायची सवय असते. खरं तर दुःख प्रत्येकाला च असतं पण काही जण ते दाखवतात तर काही जण त्यातूनच आपला मार्ग काढतात. सर्वात महत्वाचे दुःखानंतर जे सुख मिळते ते फारच अविस्मरणीय असते.
परवा fb वर अशाच एका व्यक्तीविषयी वाचले ज्याला दोन्ही हात नाहीत तरीही तो उत्तम चित्र काढतो तेही पायाच्या अन् तोंडाच्या सहाय्याने. केवढे अफाट आहे हे!
तो त्याचा कुंचला एखाद्या सराईत चित्रकारा इतकाच शिताफीने कधी तोंडाने तर कधी पायाने फिरवत उत्कृष्ट अन् अत्यंत बोलके असे चित्र रेखाटतो.
हा माणूस एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की ज्यांच्या कडे कसली तरी शारीरिक कमतरता असते तरीही ते न डगमगता आपल्या ध्येयाच्या दिशेने चालत राहतात.
आपल्या कमजोरीचा बाऊ न करता तिलाच आपली ताकद बनवतात. हळूहळू लोकही त्यांचे वेगळेपण मान्य करून त्यांना आपल्यात सामावून घेतात. हाच तर खरा त्या व्यक्तींचा सन्मान होय.
म्हणून च माणसाने नेहमी आपल्याकडे जे आहे त्याचा योग्य उपयोग करून घ्यावा अन् जे नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे आहे त्यातच आनंद मानावा. नाहीतर कल्पित अशा मृगजळापाठी धावता धावता कधी दमछाक होऊन आयुष्य मेटाकुटीला येईल ते कळणारच नाही.

देव पण न जाणे
कशी माणसे घडवतो
एखाद्याला खूप सारे देतो
तर दुसऱ्याला मात्र उपाशीच ठेवतो
दात आहेत तर चणे नाहीत
अन् चणे आहेत  तर दातच नाहीत
अशीच गत करतो
पण देवा तुला काय माहित
तूच निर्मिलेला हा मनुष्य प्राणी आहे
बुध्दिमान
तो लढवितो शक्कल
कमजोरीलाच बनवितो ताकद
करतो असाध्यालाही साध्य
मिळवितो खूप सारा सन्मान
जगतो आयुष्य ताठ मानेनं
अन् उजळ माथ्यानं तहहयात

मृणाल वाळिंबे
माणूस हा जसा  बुध्दिवादी प्राणी आहे. तसाच तो भूत भविष्य आणि वर्तमान या साऱ्या काळात गुरफटणाराही आहे.
तसे बघितले तर ह्या तीन काळांना भाषेच्या व्याकरणात अनन्यसाधारण महत्व आहे.
पण मनुष्याच्या बाबतीत मात्र थोडेसे भिन्न आहे.
भूतकाळ म्हणजे घडून गेलेला काळ जो कधीच परत येत नसतो. तरीही मनुष्य त्यातच रमतो अन् जर गतकाळात काही वाईट घडले असेल तर तेच तेच आठवून कुढत बसतो.
भविष्यकाळ म्हणजे येणाऱ्या क्षणांची चाहुल खरं तर तशी ती थोडी फार प्रत्येकालाच होत असते काही जण त्या कडे डोळसपणे पाहतात तर काही जण नजरअंदाज करतात.
वर्तमान काळ म्हणजे सध्याचा चालू काळ.
आजकाल लोकं वर्तमानात जगण्यापेक्षा उद्याचीच चिंता जास्त करतात. भविष्यात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. अशाच अट्टाहासापायी काही लोक मग बुवा बाबा यांच्या मागे लागतात. प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीची तिची अशी एक वेळ असते त्याच वेळेस ती घडत असते तरीही नियती निर्सग यांना डावलून आधीच जाणून घेण्याच्या हट्टामुळे मनुष्य आजचा बहुमूल्य क्षण जगू शकत नाही.
हि फार मोठी शोकांतिका आहे की मनुष्याने एवढी प्रगती केली आहे की तो चंद्रावर जाऊन पोहोचला परंतु पंचमहाभूतांवर तो विजय नाही मिळवू शकत .त्यामुळे च आपण हे मान्य च केले पाहिजे की आपण आपले कर्म करत रहावे भविष्याची काळजी न करता अन् भूतकाळाचं ओझं न बाळगता.

आयुष्य आहे मर्यादित
म्हणून रडण्यापेक्षा
आजचा क्षण जगा
भूतभविष्याची सोडा चिंता
भूतकाळातील आठवणींच्या
हिंदोळ्यावर  होऊ नका स्वार
भविष्याच्या चिंतेने होऊ नका
हवालदिल
वर्तमानातील सुखाचे क्षण
शिका टिपायला
कधी सुखात तर
कधी दुःखात
आयुष्य भरभरून जगत रहा
तुमच्या अस्तित्वाने
माहोल करा प्रफुल्लित
 बघा आयुष्याकडे
सुंदरेतेच्या काचांनी
अन् मिळवा समाधान
या साऱ्या मौलिक क्षण जगण्याचे

मृणाल वाळिंबे

Thursday, 27 September 2018

गणेशोत्सव

गणेशोत्सव २ दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घरोघरी गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी चालू झाली आहे. कोणी घरातच मखर बनवत आहेत तर कोणी विकतच्या मखरांची दुकाने पालथी घालत आहे.
खर तरं आमच्या लहानपणी अशी परिस्थिती नव्हती एवढ्या गणपती सजावटीच्या वस्तूचं नव्हत्या पण सण म्हणून दुसऱ्या गावाला असणारे काका काकू आत्या या साऱ्यांची मात्र रेलचेल असायची. काकू आत्या यांच्या हातच्या नवीन पर्दाथांची लज्जत काही     औरच असायची. तेव्हा वाटायचं हा गणपती सोहळा संपूच नये. छान बोधप्रत असे गणपतीचे देखावे अन् घरचे रोजचे गोडाधोडाचे जेवण यात दहा दिवस कसे संपायचे ते कळायचेच नाही.
लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव त्या वेळच्या इंग्रजी राजवटीला शह देण्यासाठी आपल्या लोकांनी एकत्र यावे अन् समाज प्रबोधन व्हावे यासाठी चालू केला. परंतु हळूहळू त्याला बाजारीकरणाचे स्वरूप येऊन त्याचा विचका झाला. आता तर त्या डीजे च्या वर काही तरी गाणी लावून नाचणे असेच त्याचे स्वरुप झाले आहे.
जर लोकमान्य टिळक स्वर्गातून बघत असतील तर त्यांना खूपच वाईट वाटत असेलं आणि खुद्द गणपती बाप्पा तर आता दहा दिवसाचा वनवास पृथ्वीवर भोगून येतो असेच सांगत असेल पार्वती मातेला.

झुंजूमंजू झाले
कोंबडा आरवला
अन् प्रभाती जाग आली
आळस झटकला
अन् बाप्पाच्या आगमनाची
आठवण झाली
मी म्हणलं बाप्पा
यावर्षी येताना मनाशी
पक्की खूणगाठ ठेव
जिथे जिथे लावतील डीजे
अन् करतील वेडेवाकडे नाचांचे चाळे
तिथे तिथे तू दाखवशील आपुले रौद्र रुप
जिथे होईल मनोभावे पूजा
करतील खरी तुझी आब राखून आरती
तिथे दे तू भक्तांना खराखुरा औआशिर्वाद
आणखी एक सांगते बाप्पा तुला
नवसाच्या नावावर जे बाजार
मांडतात त्यांना खरचंच
एकदा तरी दाखव रे तुझा इंगा
म्हणजेच होईल या साऱ्या
समूळ नाश
अन् होईल खरा गणेशोत्सव
लोकमान्यांना अभिप्रेत असलेला

मृणाल वाळिंबे

Nostalgic आठवणी

जसे जसे आपण मोठे होत जातो तसे तसे खूप साऱ्या गोष्टी मागे पडल्याची जाणीव होऊ लागते. बालपणी केलेली मौजमजा ,उगीच च कुणाची तरी उडवलेली खिल्ली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यावेळी असलेल्या priorities उदाहरण द्यायचे तर साध्या कुणी आलेल्या पाहुण्यांनी दिलेली छोटीशी gift मग ती काही ही असो पण आपल्याला स्वतःला मिळाली याचा आनंदच काही और असे.

आता खूप सारे मुबलक मिळते पण का कोणास ठाऊक लहानपणी कधीतरी मिळणाऱ्या छोट्या श्या गोष्टीचे खूप अप्रूप वाटे.जुने परत कधीच येत नाही हा तर निर्सग  नियमच आहे. हळूहळू वय वाढले की हा सारा निरागस भाव नाहीसा होऊन घाण्याला जुंपलेल्या बैलाची अवस्था होते. कधी कुटुंब साठी कधी स्वतःच्या करिअर साठी आपण धावत राहतो. या धावण्यात इतकी दमछाक होते की आपल्यातील लहान मुलं कुठल्या कुठे पळून जाते अन् उरते ते फक्त यंत्रवत शरीर मन भावना बोथट झालेले असे.
खर तरं ही सारी जगरहाटीचं आहे. परंतु आपणच थोडे बदलावयास हवे. काम करावे पण इतकेही नको की स्वतःच्या गरजांचाच विसर पडले. कधीतरी आपल्या मधे लपलेल्या त्या छोट्या मुलाला जागे करावे अन् त्याला मनसोक्त बागडू द्यावे. बघा किती मनःशांती मिळते ती.

सारा पसारा सावरता सावरता
खूप दूर निघून आले
आताशा वाटे मज
व्हावे लहानगे
वेचाव्या चिंचा बोरे
करावी धमाल मस्ती
अगदी बालपणी सारखीचं
या साऱ्या कामाचा
 व्याप सारावा बाजूला
हुंदडावे मनसोक्त
मन मानेल तसे
करावा सोहळा या
चोरलेल्या क्षणांचा
अन् मिळवावा खरा
आत्मिक आनंद
या दुनियेत जगण्याचा
तरचं होईल खरं
या जीवनाचं सार्थक
मिळेलं अलौकिक असं
सुखं समाधान

मृणाल वाळिंबे

Wednesday, 26 September 2018

अनलिमिटेड


Whatsapp वर एक कविता वाचनात आली अनलिमिटेड. खूप उत्सुकतेने मी ती वाचली त्यातील खूप गोष्टी मनाला भावल्या. त्यातूनच ही पोस्ट लिहिण्याची उर्मी मनात आली.

खर तरं आमच्या वेळी (असं म्हणलं की आजी आजोबांच्या पिढीची प्रर्कषाने आठवण येते) जग इतकं जवळ आलेलं नव्हतं एवढी सारी माहिती मिळवण्याची साधनेही नव्हती इतकी सुबत्ताही नव्हती त्यामुळे च की काय साऱ्याच गोष्टी लिमिटेड च होत्या. अनलिमिटेड शब्दच सहसा ऐकिवात येत नव्हता.

साधाच उदाहरण घ्यायचं झालं तर दूरचित्रवाणी वर सुध्दा इतकी सारी भरमसाठ channels नव्हती त्यामुळे तो सगळ्यांनी एकत्र बसूनच बघितला जायचा अन् त्यातच खूप मज्जा यायची. आताश्या एवढ्या साऱ्या channel मूळे खूप सारे options तयार होतात त्यामुळे प्रत्येक खोलीत tv दिसू लागले आहेत. म्हणून च लहान मुले इतकी tv पाहतात त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर अन् एकूणच तब्बेतीवर होतो आहे.

खूप साऱ्या अमर्याद गाड्यांमुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत अन् परिणामी रोजरोज वाहतूक कोंडीला देताना मनुष्याची सगळी शक्ती खर्ची पडत आहे.

आपलं मूल सर्वात पारंगत पाहिजे या अट्टाहासापायी त्याला  सर्वच क्षेत्रातील क्लास लाऊन त्याची इतकी मुस्कटदाबी केली जाते की त्या मुलाला स्वतःला आपण नक्की कशात निपुण व्हावे हेच कळत नाही अन् त्याची अवस्था 'एक ना धड भाराभर चिंध्या' या मराठी म्हणी सारखी होते आहे.

परवा माझ्या एका क्लासच्या मुलाला मी एक प्रश्न विचारला तर तो म्हणाला  आमच्या अभ्यासात नाही मी म्हणाले मागच्याच वर्षी हे होऊन गेले आहे कसे येत नाही? त्यावर तो म्हणाला मँडम google वर search केले की सगळेचं सापडते कशाला हे सारे लक्षात ठेऊन डोक्याची भेंडी करायची. मी निःशब्द काय बोलणार या अर्तक्य logic बद्दल

 म्हणून च वाटते खरचं पूर्वी होते ना तेच बरे होते सर्व कसे लिमिटेड असल्यामुळे हातपाय पसरायचा प्रश्नच नव्हता मुळी

 काळ बदलला
खूप सारे मागे टाकून
प्रगती पथावर चालला
जग जवळ आले
अन् मनुष्य मात्र दुरावला
दुनियेला कवेत घेता घेता
स्वतःहाचे अस्तित्व मात्र
हरवून बसला
खूप साऱ्या अनलिमिटेड ला
कवटाळताना
लिमिटेड अशा नात्यांना मात्र
पारखा झाला
Facebook whatsapp या
Virtual media वर संवाद
साधता साधता
स्वतःचा स्वःताशी संवादच
खुंटला
जगातल्या साऱ्या अनलिमिटेड
गोष्टींना घाला गवसणी
मात्र लिमिटेड आयुष्यातच

मृणाल वाळिंबे

नातं


आजकाल पेपर बघितला की मनावर एका मागून एक आघात होतात. कुठे कुणी कुणावर बलात्कार केला कुठे इस्टेट मिळवण्यासाठी भावानेच भावाचा काटा काढला घटस्पोटाची एक तरी घटना असतेच. किती भयंकर आहे हे अमानवी अमानुष असे. खरचं आपली एवढी नीतीमूल्ये बदलली आहेत की चांगल्या वाईटातला फरकच दिसत नाही. आपल्या भावना एवढ्या बोथट झाल्या आहेत की बऱ्या वाईटाची चाडच राहिली नाही. ज्या समाजात आपण राहतो त्या चे काही तरी ऋण आपल्यावर आहेत हेच आपण सोयीस्कर पणे विसरलो आहोत का?

खर तरं नातं हा दोन अक्षरीच शब्द परंतु खूप मोठा अर्थ दडला आहे त्यात. कुठल्याही दोन व्यक्ती चं नातं जुळण्यासाठी रक्ताची गरज नसते तर विचार आचार जुळण्याची जास्त गरज असते.नातं मग ते नवरा बायको चं असू दे नाही तर सासू सुनेचं नणंद भावजयीचं असू दे. ते जुळण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो निर्सग चा नियमच आहे कुठलीही गोष्ट आपसूक एका सेंकदात तयार होतं नाही तसचं नात्याचं असतं.
आपण जेव्हा नवीन झाडं लावतो तेव्हा त्याला त्या नव्या कुंडीतल्या मातीत रूजण्यासाठी थोडे दिवस जाऊ देतोच ना फक्त पाणी घालत राहतो की जेणेकरुन त्याने या नव्या हवेत नव्या वातावरणात घट्ट मुळे रोवावीत म्हणून. नात्याचं ही असचं असतं हळुवार अलगद असं ते उलगडत जातं मग आपसूकच त्याची घट्ट वीण होते.
पण या साऱ्या process ला जो वेळ द्यावा लागतो ना तोच आजकाल नाहीसा  झाला आहे. Ready to eat च्या या जमान्यात
सगळं लगेचच हवे आहे त्यासाठी द्यावा लागणारा वेळ अन् patience मुळी लुप्त पावत चालला आहे. याचेच पर्यवसान मग नाती नाहीशी होण्यात होत आहे.
मला वाटते नवी पिढी खरं तर खूप हुशार आहे. त्यांच्याकडे ज्ञानाचे भांडार आहे. नाही आहे तो patience तो जर त्यांनी आत्मसात केला तर त्यांना नाती जपा असे सल्लेच द्यावे लागणार नाहीत.

नातं कुठलही असो
रक्ताचं वा मैत्रीचं
ते तेव्हाचं बहरतं
जेव्हा त्याला समजुतीचं
कोंदण मिळतं
नात्याचा पोतं असा असावा
की जोअलवार उलगडला
तर घबाडं गवसावं
नातं असं असावं
अगदी घट्ट वीणीने गुंफलेलं
नात्यात नसावा मीपणाचा
अहंकार
असावा फक्त आपलेपणाचा
आश्वासक हुंकार
म्हणूनच म्हणते
शिका नाती जोडायला
 ती निभावायला
करा प्रयत्नांची पराकाष्ठा
अन् करा सोहळा
नात्यांच्या जडणघडणीचा

मृणाल वाळिंबे

तफावत


दोन दिवसापूर्वी दळण आणायला गेले होते.अर्थातच दळण गिरणीत ठेवून परत आणायला जायचा फारसा उत्साह नव्हता म्हणून तेथेच थांबले. तेवढ्यात एक शाळकरी मुलगा आला मला वाटले आई बहीण कोणीतरी दळण ठेवून गेले असेल अन् तो घ्यायला आला असेल पण तसे नव्हतेच . गिरणीवाल्या दादांनी त्याला नीट चाळून घ्यायला सांग रे घरी म्हणल्यावर मी कान टवकारले माझी थोडी उत्सुकताही चाळवली गेली. मग मी विचारले दादांना काय प्रकार आहे. त्यांनी जे सांगितले ते ऐकून पोटात गलबले. ते म्हणाले त्याची आई धुणीभांडी करते पण पैसे पुरत नाहीत  त्याचा बाप फक्त दारूच पितो अन् काही च काम करत नाही त्या बाईला मुलाला शिकवायचे आहे म्हणून ती बिचारी पै पै जोडते आहे. तिनेच मला सांगितले गिरणीच्या चाकात जो चाळ राहतो सर्व दळणांचा तो देत जा म्हणजे या पोरांची पोटं तरी भागतील. ऐकून खूप वाईट वाटले.
त्याच दिवशी संध्याकाळी हाँटेलात जाण्याचा योग आला.योगायोगाने आमच्याच शेजारच्या टेबलवर एक चौकोनी सुखवस्तु कुटुंब बसले होते. दोन लहान मुले आईवडीलांसमोर  एक एक पर्दाथांची फर्माईश करत होते आईवडील बऱ्यापैकी त्यांची आवड जपत होते परंतु अचानक माझे लक्ष गेले तर त्या मुलांनी एवढे अन्न वाया घालवले होते पण आई वडिलांना त्याचे काही सोयरसुतक आहे असे त्यांच्या कडे बघून वाटत च नव्हते याचे खूपच वाईट वाटले.
केवढा हा विरोधाभास एक बाई आपल्या मुलांना खायला मिळावे म्हणून स्वतः ला विसरुन काबाडकष्ट करते आणि दुसरीकडे एवढी सुबत्ता की त्या मुलांनी वाया घालवलेल्या अन्नाचे काही च वाटत नाही.
शेवटी काय ही सारी जगरहाटी आहे. ज्यांच्याकडे आहे ते वाढतच आहे परंतु त्याबरोबरच उन्मत्त पणाही वाढत आहे. ज्यांकडे नाही त्यांची कीव करण्यापेक्षा त्यांना काही तरी आपण मदत करु शकलो तर खरचं ही तफावत थोडी तरी कमी होईल. बघा थोडासा विचार करा ज्या समाजात आपण राहतो त्याचे थोडे तरी ऋण फेडण्याचा .

नाणं म्हणलं की
दोन बाजू आल्या
कधी चीत तर
कधी पड
एक गरीब आई सांगे
पिलास
मी देईन तुझी साथ
जीवात जीव असस्तोवर
तर दुसरी धनवान आई म्हणे
नकोस घाबरु सोडवीन मी
तुला पदोपदी
हाती पैसा असस्तोवर
खरचं रे ही प्रगती
काय कामाची
जिथे असे ही तफावत सारी
जिथे दिसे फक्त अन्
फक्त स्वतःचीच उन्नती
नसे तमा आजूबाजूच्या
समाजाची
अरे वेड्यांनो आता तरी
व्हा जागे
या साऱ्या क्षणभंगुर मायाजालाला
द्या झुगारून
 करा थोडेसे सत्पात्री दान
 मिळावा आनंद देण्यातला
अन् लुटा समाधान आयुष्यभराचे

मृणाल वाळिंबे
बोलावसं वाटलं कधी,
नक्कीच व्हावं व्यक्त...
माणुस मात्र असावा,
अगदी जवळचा फक्त....!!
प्रेम करावं कुणावर,
त्याला सीमाच नसावी....
भावनाच इतकी गोडं,
जी अखंड जपावी...!!
रागही आलाच कधी,
तोही असावा लटका...
फार काळ टिकु नये,
असावा एखादं घटका....!!
शब्दाने शब्द वाढू नये,
कधी ताणू नये जास्त...
बोलून मिटवावं सारं,
हेच सगळ्यात रास्त...!!
कधी लागु देऊ नये,
अबोल्याचं कोंदण...
झालाचं जर कधी,
चुकून एखादं भांडण...!!
मनाने होऊ नये
कधी दूर
जरी असेल काही सल..!!
होऊन जावे  इतके
एकसंध
की होताच येणार
नाही  कधी विलग..!!
असेच जगावे अलवार
अळवावरच्या पाण्यासारखे
अन् करावा सोहळा
येणाऱ्या क्षणांचा
लुटावा आनंद मनमुराद
जगण्याचा...!!

मृणाल वाळिंबे