Thursday, 28 June 2012

मैत्री - एक तपस्या

मानवी नात्यांचा दुवा म्हणजे मैत्री
मैत्री असते अहंकाराला दूर करण्यासाठी
मैत्रीत नसतो हेवा दावा
असतो फक्त आपलेपणा
मैत्री असते तपश्चर्या
वर्षानुवर्षे निभावण्याची
मैत्री असते श्रद्धा
अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याची
मैत्री असते एक पाश
असा की जो कधी बंधन न वाटणारा
मैत्री असते आयुष्यभराची
उत्सव, सोहळा साजरा करण्याची
मैत्री एक असा बंध
जो इतर कोणत्याच नात्यात नाही
मैत्री म्हणजे निरपेक्ष प्रेम
ज्यात "मी" ला स्थानच नाही
नियतीने तयार केलेल्या
या मनाच्या पाशाला
चिरंतन तेवत ठेवावे मनातल्या
                                  मनात
म्हणूनच मैत्री  करावी
अन्  त्यात तयारी ठेवावी
               समर्पित व्हायची



                       मृणाल वाळिंबे

Tuesday, 26 June 2012

लग्न

लग्न म्हणजे एक समारंभ
लग्न एक रेशीमगाठ
लग्न एक बंधन
लग्न असते फणसासारखे
बाहेरून काटेरी
आतून गोड
दिसायला काटेरी बंधन
चाखायला गोड गरा
जसं फणसात शिरल्याशिवाय
गरा मिळत नाही
तसं दोन मन मिळाल्याशिवाय
संसार सुख मिळत नाही
संसार टिकविण्यासाठी
हवा नात्यात गोडवा
हवा विश्वास जोडीदाराचा
संसार असावा असा
जणू काही बयाबाईचा खोपा
म्हणूनच म्हणते संसारात पडावं
म्हणजेच कळते त्यातील गंमत

                मृणाल वाळिंबे 

Monday, 25 June 2012

आयुष्याचं गमक


दुःख दुःख करत
माणूस जगणेच विसरतो
अन् त्या दुःखालाच कुरवाळत जगत राहतो
पण कधीतरी द्या विसावा
या मनातील दुःखाला
विचार मनाला तू या आधी कधी हसला बाबा
नाहीना ,
तेच तर म्हणते मी
आयुष्याचा पतंग उडविण्यासाठी
दुःखाला टाका मागे
बोट धरा सुखाचे
म्हणजेच तुमचा पतंग
घेइल गगनी भरारी
अन् होईल तुमची सरशी
दरवळू द्या आयुष्याचा
गंध मोगऱ्यासारखा
बहरु द्या आयुष्य
वटवृक्षा सारखे
उजळू द्या लाख ज्योती
न मोजता येणाऱ्या
अन् इतरांना तोंडात
बोटे घालायला लावणाऱ्या
असाच असू दे आलेख
तुमच्या आयुष्याचा
वरवर चढणारा
हेच तर आहे गमक
जगण्याचे अन् जीवनाचे


          मृणाल वाळिंबे

Tuesday, 19 June 2012

आयुष्याची संध्याकाळ
आयुष्याच्या संध्याकाळी
मी हिशोब मांडला
काय कमावलं अन्
 काय गमावलं
कमावलं पुष्कळ धन,
       संपत्ती, ऐश्वर्य
गमावलं मात्र सुखं, प्रेम,
         आपुलकी
आयुष्यात तरण्यासाठी  मी
धन कमवत गेलो
आयुष्य वेचत गेलो
मात्र स्वजनांना दुरावत गेलो
आता वाटे मज चार क्षण
      हातात आहेत
मौज करु यात
आप्तजनांना  सुखं देऊ यात
पण,
ते तर केव्हाच पुढे निघून
                गेलेत
अन्
मीच एकटा काठावर
        उभा   आहे
बेरीज ,वजाबाकीचा हिशेब
                 जुळवत
                                 मृणाल वाळिंबे
                           स्वप्न

स्वप्न एक आभास
स्वप्न एक imagination
स्वप्न म्हणजे मनातील
             भावभावनांची मिसळ
स्वप्नात रंगून वास्तवाशी
                                   होतो लपंडाव
स्वप्नात दंगून माणूस
              हरवतो स्वर्गात
स्वप्न पहावे अशक्य पूर्तीचं
अन् त्या पूर्तीसाठी
         वास्तवात झटावे 
स्वप्न पहावे आकाशाला 
           गवसणी घालण्याचं
म्हणजेच वाढते क्रयशक्ती
स्वप्न पहाव,
पण वास्तवाचं भान ठेवावं
अन् स्वप्नपूर्तीसाठी झटावं


            मृणाल वाळिंबे

Wednesday, 13 June 2012

आयुष्य


आयुष्य एक नाटक
याची सुरुवात म्हणजे जन्म
अन् शेवट म्हणजे मृत्यू
आयुष्यातील वळणं
म्हणजे नाटकातील एक एक अंक
आपण सारे रंगकर्मी
अन् सूत्रधार तो विधाता
त्याने नाचवावे
अन् आपण नाचावे
म्हणूनच म्हणते
माणूस म्हणतो मी केलं
हे असतं धादात् खोटं
तो विधाता घेतो करवून
अन् तोच देतो बुद्धी
कशाला बाळगा
फाजील अभिमान
तुम्ही नाही अन्य कोणीतरी
पण जे होणार ते मात्र
अटळ, विधिलिखित
त्यामुळे नाटकाचा पडदा
पडेपर्यंत पहात रहावं
अन् शेवट हसावं कारण
आपण असतो कठपुतली
         विधात्याच्या हातची

                             मृणाल वाळिंबे

Tuesday, 12 June 2012

सेवा एक भक्ती



सेवा एक भाव
सेवा एक कृती
सेवा एक ध्यास
सेवा एक वसा
सेवा एक भक्ती
घेऊन सेवेचा वसा
करा कार्याचा प्रारंभ
केल्याने सेवा
होते सत्कर्म
होती कृती रुजी देवाचिये द्वारी
केल्याने सेवा
मिळतो आत्मिक आनंद
राहतो मानव सत्शील
सेवा करावी कधीही
कुणाचीही, केव्हाही
मिळवावे त्यातील समाधान
अन् करावा त्याचा आनंद
कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात
घ्यावा सेवेचा ध्यास
न्यावे ते पूर्णत्वाला
म्हणजेच होते त्या सेवेची
                           भक्ती
                                     



                                   मृणाल वाळिंबे


Friday, 1 June 2012

नातं

नातं म्हणजे हळुवार बंधन
आंबट गोड तुरट खारट
नातं म्हणजे गोड गुपित
दोन लोकांना
एकत्र आणणारं अन्
जोडून ठेवणारं
नातं कसं नारळासारखं
आतून मऊ अन्
बाहेरून कडक
नातं कसं लोणच्यासारखं
आधी करकरीत
अन् मुरलं की तरंगणार
नातं म्हणजे खूप जपणं
खूप खपण अन् खूप मिळवणं
नातं जमलं की
मेतकूट जमते
अन् जमलेलं मेतकूट
छान चविष्ट बनतं
म्हणूनच
नातं जमवावं
जमवून घ्यावं
जुळवून घ्यावं
अन् त्याची फळं  चाखावी



                 मृणाल वाळिंबे