Thursday, 31 May 2012

भावना


माझ्याच भावनांचा
मी खेळ मांडला
थोडयाशा दुःखाचा
मी हसून स्वीकार केला
खूपशा सुखाचा
मी नाचून आनंद केला
मनातल्या भावना
मी नेहमीच दडविल्या
अन् मग हि लेखणीच 
कामी  आली
मी उतरवित गेले
अन् कविताच तयार झाली
एक एक दुःख माझे
मी मागेच टाकले रे
एक एक सुख माझे
मी ओंजळीने टिपले रे
जगातल्या दुःखाचा विचार
आला मनी
अन् वाटले मी एक सुखी
जी आहे आनंदाची स्वामिनी

                           मृणाल वाळिंबे

Monday, 28 May 2012

माणूस - एक अजब रसायन

माणूस एक तीन अक्षरी शब्द साधा सोपा सरळ पण या तीन अक्षरांत खूप काही समावलेल आहे.
माणूस म्हणजे सजीव ज्याला चेतन अचेतन संवेदना आहेत. ज्याला एक तरल हळुवार मन आहे.
ज्याला डोळ्यांवर असलेल्याला डोक्यात बुद्धी आहे. जिचा वापर तो स्वतःच्या भल्यासाठी करु शकतो.
या माणूस नावाच्या प्राण्यात ब्रम्हदेवाने एक अजब रसायन घातले आहे. जे मन आणि व्यवहार यांची गल्लत करत नाही. अशा या माणसाची कहाणी तो जन्माला आला कि चालू होते अन् मरण पावला कि त्याच्यापुरती संपते. या माणसाला एक संवेदना देवाने जास्त दिली ती म्हणजे गर्व . "स्व" चा फाजील अभिमान . त्यामुळेच कुठलेही कृत्य हातून घडले की "मी केले" अशीच त्याची वल्गना पण खरं तर त्याच्या कृत्यामागे भगवंतच असतो तोच ते त्याच्याकडून करवून घेतो अगदी "कळसूत्री" बाहुलीप्रमाणे म्हणूनच माणसाने जन्मात परोपकार करावा, पुण्य मिळवावे अन् जमलेच तर  अहंकार विसरून कर्म करावे जे देवाच्या चरणी रुजू होते. अशा या मानवरूपी मर्त्य माणसाला माझा सलाम.


माणूस

माणूस एक अजब रसायन
त्याला आहे मन अन् शरीर
मनाचा गाभारा भावना दडविण्यासाठी
अन् शरीर फक्त थकेपर्यंत चालण्यासाठी
माणूस हा तर सचेतन, बुद्धिवादी
म्हणूनच तर त्याला लागते घालायला
आयुष्याची सांगड कर्तव्याशी
माणूस हा खरं तर मर्त्य
पण कर्तुत्वाने होतो तो अजरामर प्राणी
माणूस असतो गुण अन् दुर्गुणांची मिसळ
जेव्हा दुर्गुण हवि होतात गुणांवर
तेव्हा होतो तो हैवान
अन् गुणच जेव्हा दुर्गुण मारतात
तेव्हाच होतो जन्म देवाचा
देवत्व असते माणसात
त्याच्या चांगुलपणात
त्याच्या सत्कृत्यात
त्याच्या सत्कर्मात
असा हा माणूस
एक निराळाच प्राणी
दोन पायांचा


                  मृणाल वाळिंबे

                                                                                                    

महागाई पेट्रोलची

पेट्रोल पेट्रोल म्हणत
अश्रू ढाळायची वेळ आली
               महागाई महागाई म्हणत
               सामान्य माणसाची पाठच मोडली
आता मात्र अति झाले
               सरकारच्या डोळ्यांत अंजन
               घालण्याची वेळ आली
     
             
           
 मृणाल वाळिंबे

Friday, 25 May 2012

दान
दान म्हणजे देण
परत कधीही न घेण्यासारखं
दान म्हणजे दातृत्व
एका हाताचे दुसऱ्या हातालाही
न कळण्यासारखं
दान म्हणजे एक कृती
अशी कृती कि जिच्यामुळे 
माणसाचं मोठ मन कळत
दान हा एक विचार
ज्यामुळे माणसाची बुद्धि 
होते समृद्ध
दान हा एक मानस
जो ज्याने त्याने ठेवावा मनात
अन् आणावा आचरणात
जेवढा जमेल तेवढा
अन् जिथे जमेल तिथे
दान करावे अन्
त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करावे
आजच्या युगात
अशा दानांची गरज आहे
जगाला

          मृणाल वाळिंबे

Thursday, 24 May 2012

मी सकाळी नेहमीसारखीच चालायला गेले होते . मी खरं तर माझ्याच तंद्रीत होते. सकाळीची आल्हादायक  हवा त्याचा मी आस्वाद घेत होते.अन् अचानक हाक ऐकू आली .मला पहिल्यांदा वाटले भास झाला. पण नाही कोणीतरी खरंच हाक मारत होत. हाक मारणारी व्यक्ती माझ्या मागेच होती.
मी पाहीले अन् माझा विश्वास बसेना हि तर माझी बालपणीची मैत्रिण . मग आम्ही एकमेकीची चौकशी केली अन् परत नक्कीच भेटण्याचा वायदा करून निघालो आपापल्या मार्गाने. त्या नंतरच हि कविता सुचली.

दोन सख्या

दोन ध्रुवावर  दोन सख्या
ओढीत होत्या संसाराचा रेटा  
मनात जागवित  जुन्या मैत्रीचा ठेवा 
प्रपंच  बहरला
व्याप वाढला
अनेक नातेसंबंध जुळले
पण कुणी अंतःकरणाला भिडलेच  नाहीत
कुणासाठी हृदयाची तार छेडलीच नाही
अन् सख्या राहिल्या रिक्त मोकळ्या 
एक दिवस अचानक 
आल्या एकमेकींना सामोऱ्या
ताटाखालून खूप पाणी वाहिल्यामुळे
बाह्यरंग पार बदलून गेले होते
मात्र अंतरंग तसेच होते ताजे
                टवटवीत ,हिरवे  
ओळख पटली सख्याना
ढगांच्या गर्जनेने मोर जसा
पिसारा फुलवून नाचतो
तसेच काहीसे सख्यांना वाटले
नाचावे,बागडावे
पावसाच्या धारा जशा कोसळतात
तशा सख्या मायेच्या वर्षावात
     न्हाऊन निघाल्या
इतके वर्षांची हितगुज करु लागल्या
   मनाच्या गाभाऱ्यातून
त्यांना पाहून लोक म्हणू लागले
हि खरी मैत्री
जी चिरंतन जागवली या
दोन सख्यांनी आपल्या मनाच्या कुपीत


                         मृणाल वाळिंबे

Wednesday, 23 May 2012

माया
माया एक ऊब
नात्यांची, प्रेमाची, अन_मनाची
मायेत असतो ओलावा
मनाचा,प्रेमाचा
माया असते अदृश्य
पण ती जाणवते मनाला
माया असते अदभुत
ती असते आई मुलात
ती असते आजी नातवंडात
मायेला नसत  बंधन
मायेला असत स्पंदन
माया असते हत्यार
प्रतिस्पर्ध्याला जिंकण्याच
माया असते एक माध्यम
दुसऱ्याला आपलंस करण्याचं
म्हणूनच,
माया करावी
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत

      मृणाल वाळिंबे   

Tuesday, 22 May 2012

आई  तुझी आठवण

 

आई म्हणजे मूर्तिमंत माउली
घाले सदैव मायेची सावली
असे कर्तव्यतत्पर अन_ उत्साही
धावे सदैव दुसऱ्यांसाठी
 म्हणे करावे कर्म मनःशांतीसाठी
धरावी कास सत्याची
ठेवावा विश्वास भगवंताच्या चरणाशी 
आई    म्हणजे  ज्ञानाचा झरा 
       मायेचा  ओलावा 
आई   म्हणजे खळखळता  झरा
         उत्साह अन_ आनंदाचा
आई  म्हणजे  हृदयाची हाक
     निःशब्द  जाग
आई म्हणजे  क्षमेची मूर्ती  
   मुलांचे अपराध पोटात घालणारी
आई होती परोपकारी
स्वतःसाठी  न जगता 
इतरांसाठी  जगत राहणारी 
आई तुझी आठवण येते 
तू आहेस  माझ्या  चराचरात 
सदैव तेवत  माझ्या  मनात


        मृणाल वाळिंबे



पराभव 
पराभव  म्हणजे लौकिक अर्थाने 
                               नापास 
पराभवरुपी सागरात तरण्यासाठी 
 तुमची इच्छाशक्ती  लागते  प्रबळ 
पराभव  असतो क्षणिक
त्यासाठी कशाला त्रागा
पराभव पचवावा 
अन_ त्याचा शोक  न करता  
नवीन वाट शोधावी
हवीहवीशी , जय मिळवून देणारी
  विजय झाला  की
प्रगती खुंटते
पण पराभवात मात्र
    माणसाला खूप दिशा मिळतात
म्हणूनच त्याची प्रगती वाढते
    वाऱ्यासारखी झपाट्याने 
अन_ त्या प्रगतीचा होतो 
        महावृक्ष 
कुठल्याही वादळाला  न भिणारा ,
न  उन्मळून  पडणारा,
म्हणूनच म्हणतात ,
     पराभव हीच  यशाची 
पहिली  पायरी 
 
       मृणाल वाळिंबे 
गजानन
गजानना गणनायका
तूच आमचे दैवत
तूच आमची श्रद्धा
तूच आमची  प्रेरणा
आमच्या भल्याबुर्याचा
तूच एक साक्षीदार
आमच्या सार्या चुका
     घालीशी उदरात
म्हणूनच तर तू लंबोदर
गजानना एकदंता
तूच आमच्या बुद्धिची
         चालना
माझ्या लेखणीचा
तूच करता करविता
गजानना मोरेश्वरा,
तुझा आशिर्वाद
असावा सदैव
आमच्या पाठीशी
तरच तरू आम्ही
या जनसागरात
    मृणाल वाळिंबे

Monday, 21 May 2012

परमेश्वर
 
परमेश्वर  एक शक्ती 
 परमेश्वर एक भक्ती
परमेश्वर एक साधना
परमेश्वर आहे आपल्यातच
आपल्याच  सदाचाराचा
              विजय
आपल्याच सत्कर्माची
                   सरशी
आपल्याच सद_विवेकबुद्धिची
                       जीत
आपल्याच परोपकाराची 
                       लीला
परमेश्वर तर निराकार 
 परमेश्वर तर निरामय
परमेश्वर   पाठीराखा
  या अस्थिर जगाचा
 
 
            मृणाल वाळिंबे