Wednesday, 11 October 2017

स्त्री -एक स्वयंसिध्दा

स्त्रीला मिळालेलं  अलौकिक वरदान
म्हणजे मातृत्व
असह्य प्रसव वेदना सहन करत
   आपुल्याच पोटच्या
गोळ्याला जन्माला घालणारी
त्याच्यासाठी  साऱ्या दुनियेशीसुध्दा
  लढू शकणारी
अशी ही माता
घरच्या जबाबदारीचं सारचं
ओझे पोलणारी
प्रसंगी  नेतृत्व करत
आपल्याचं आयाबहिणींना
त्यांचे हक्क मिळवून देणारी
अशी ही रणरागिणी
साऱ्या अडी अडचणींवर
मात करत
मोठ मोठ्या क्षेत्रात
दैदीप्यमान यश मिळवत
उत्तुंग भरारी घेत
आपुले कर्तुत्व सिध्द करणारी
अशी ही कर्तुत्वान दामिनी
मातृत्व नेतृत्व कर्तुत्व
या तिन्ही आघाड्या सांभाळत
आपला ठसा उमटविणाऱ्या
स्त्री कडे अभिमानानेच पहा
अन्  करा गौरव तिचा
तरच होईल खरी नवीन
पिढीची सुसंस्कृत जडणघडण
आजच्या गर्भातच आहे
उद्याचे सुजाण भविष्य

मृणाल वाळिंबे

Tuesday, 10 October 2017

Nostalic दिवाली आठवणी


आताशा हे मज काय होई
जुन्या ॠणानुबंधाचा
आठव मनी दाटी
जुन्या आठवणींचा बोलपट
मन:चक्षू पुढे सरकू पाही
जुनं ते सोनं म्हणत
त्याच विश्वात मन रममाण होई
आत्ते मामे भावडांबरोबर
साजरी केलेली  ती दिवाळी
खमंग फराळाचा पाडलेला
तो फडशा
सुंगधी उटण्याने केलेले
ते अभ्यंग स्नान
या साऱ्यांची सय काही करता
मनातून जाताच नाही जशी
काळाच्या ओघात सारेच
पडद्याआड गेले
आताशा खूप साऱ्या
मिठाईच्या boxes येतात
पण आई आजीच्या हातच्या
फराळाची चव मनात
तशीच रूंजी घालत राहि
साऱ्या modernization मधे
कुठेतरी हे सारं
निखळ जगणं
हरवल्याची सल मात्र
कायम हृदयाच्या कप्प्यात
तशीच राही
नवीन पिढीला काय कळणार
साऱ्यांनी  एकत्र साजऱ्या केलेल्या
दिवाळीला असलेला
केवड्याचा सुंगध
पुढील दिवाळीपर्यंत
मनात दरवळणारा
अन् मन उल्हसित ठेवणारा

मृणाल वाळिंबे

Sunday, 8 October 2017

नवरा होणं सोप्प नसतं

नवरा होणं सोप्प नसतं
सगळं ऐकल्याचा आव आणून
काहीच कृती न करणंही
खूप अवघड असतं
एका बाजूला बायको
अन् दुसऱ्या बाजूला आई
अशी तारेवरची कसरत करणं
म्हणजे विस्तवाशी दोन हात
मुलं संसार career अश्या साऱ्या
आघाड्या पेलणारं नवरा
म्हणजे तर नियतिच्या हातातील
  खेळणचं असतं जणू
स्व:तहाच्या आयुष्याशाशी
कुणा एकीला बांधून घेऊन
सारा ego बाजूला ठेऊन
सदैव साथ देण्याचं वचन देणं
खूप कठीण असतं
सारं सारं निभावल्यावरही
बायकोनचं प्रपंच केला
असं म्हणण्यामुळे
परत नवरा हा प्राणी
दुर्लक्षित उपेक्षितचं
म्हणूनच
नवरा होणं सोप्प नसतं
ते एक अग्निदिव्यचं असतं

मृणाल वाळिंबे

Saturday, 7 October 2017

लहानपण देगा देवा

आताशा मज वाटे
व्हावे लहानगे
वेचावी फुले
खावी चिंचा बोरे
अगदी चवीचवीने
खेळावी भातुकली
मनसोक्त पणे
इवल्याशा मांडण्या
मांडून
बनवावा काहितरी खाऊ
अन् करावा फस्त
आपुल्याच सवंगड्यांसह
काय मजा आहे बुवा
आपुल्याच धुंदीत जगण्याची
ना कसला त्रास
ना कसले टेन्शन
छान मौज मजेत कसे
आपुल्याच कोशात गुरफटायचे
खरचं प्रत्येकानेच एक
लहान मूल आपुल्या
हृदयाच्या कुपीत दडवावे
अन् कधीतरी त्याला
उत्छृंखलपणे खेळू द्यावे
अन् घ्यावी अनुभूति
परत लहान  झाल्याची


मृणाल वाळिंबे

Thursday, 20 April 2017

नातं

नात्याला हवं 
समजुतीचं कोंदण 
आपुलकीचं लिंपण 
नको शब्दांचा मारा 
असावा भावनांचा  ओलावा 
हवा प्रेमाचा पाझर 
नको तक्रारीचा सूर 
असावा आरसपानी विश्वास 
नसावी अवास्तव अपेक्षा 
असावा खेळकरपणा 
नसावी चढाओढीची भिंत 
असावी प्रेमाची किनार 
नसावं कुठलं बंधनं 
असावी हळुवारतेची फुंकर 
नसावं तडजोडीचं लेबल 
नातं असावं 
स्वच्छ नितळ पाण्यासमान 
कुणातही मिसळून 
एकजन्य होईल असं 
असावं घट्ट दृढ अभेद्य 
सहज न तुटणारं जसं 
म्हणूनच म्हणते 
जाणा नात्यांची महती 
हातातून वेळ  
निसण्याआधी 

मृणाल वाळिंबे  

शब्द

शब्दांनीच शिकवलयं 
हसायला 
शब्दांनीच शिकवलयं 
लिहायला 
शब्दांनीच घडवलयं 
मला 
शब्दांनीच दिलायं 
आधार मला 
शब्दच तर करतात 
माझी साथ संगत 
शब्दच सखा 
शब्दच माझा कर्ता करविता 
शब्दांची गुंफण 
हिच तर माझी खरी ओळख 
हरवून जाते मी 
या शब्दांच्या दुनियेत 
अन् लेखणी उतरवत जाते 
माझ्या मनातील तगमग 
हे शब्दच घालतात 
कधी तरी घाव 
अन् होऊन जातो 
रंगाचा बेरंग 
म्हणूनच म्हणते 
करा उधळण शब्दांची 
मोत्यासमान 
पण असू द्या भान 
आशयाचं 

मृणाल वाळिंबे  

मैत्रिणी



मैत्रिणी 

मैत्रिणी माझ्या जिवाभावाच्या 
जीवाला जीव देणाऱ्या 
मनाच्या तळातून प्रेम करणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या जिव्हाळ्याच्या 
कुणाच्याही दु:खाने 
कावऱ्याबावऱ्या होणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या मायेच्या 
सदैव आईच्या तोडीने 
पाठीवरून हात फिरवणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या आपुलकीच्या 
हाकेला प्रतिसाद देणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या मनकवड्या 
मनातील भाव 
ओठावर येण्याआधीच जाणणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या प्रेमाच्या 
अत:पासून अंतापर्यंत 
प्रेम करणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या आयुष्यभराच्या 
सदैव माझी साथ देणाऱ्या 
 माझ्या जीवनाचा 
अविभाज्य घटक असणाऱ्या 
आणखी काय म्हणू 
मैत्रिणी माझ्या एकाच 
नाळेने बांधलेल्या 
जणू काही माझीच छबी 
असलेल्या 

मृणाल वाळिंबे 

Saturday, 14 January 2017

Marathi greetings for Sankranti

का कळेना  
कोणत्या क्षणी 
मन हे भांबवते 
कधी मोहरते  
कधी हुरहुरते 
हे नाते जन्मांतरीचे 
का कळेना  
कोणत्या क्षणी 
मन हे बावरते 
कधी हरवते 
हे नाते आपुलकीचे 
का कळेना  
कोणत्या क्षणी 
हे बंध जुळले प्रितीचे 
हळव्या ओल्या भावनांचे 
हे नाते रक्तापलीकडचे 
का कळेना  
कोणत्या क्षणी 
मनाच्या कप्प्यात स्थान मिळाले 
हे नाते पूर्वजन्मीचे 
मनास भिडलेले हे नाते 
असेच रहावे घट्ट कधीही 
विलग न होण्यासाठी 

मृणाल वाळिंबे 

अशा साऱ्या माझ्या सहदयांना 
संक्रांतिच्या खूप शुभेच्छा 
तिळगूळ घ्या अन् गोड गोड बोला