Wednesday, 31 July 2013

मैत्री

                  

मैत्री असावी पाण्यासारखी 
         निर्मळ, नितळ, स्वछ जशी
मैत्री असावी समुद्रासारखी 
         उधाण आलेल्या बेधुंद लाटच जशी
मैत्री असावी घनदाट वृक्षासारखी
          थकलेल्या जीवाला सावली देणारी
मैत्री असावी स्वच्छंदी
           फुलपाखरासारखी 
मैत्री असावी नात्यांपलीकडची
             जात, धर्म,वय, भाषा न झुगारणारी
मैत्री असावी अशी 
                की शब्दांत न मांडता येणारी
पण सुखं दु:खात नि:शब्द साथ देणारी
               अन् चिरंतन टिकणारी


Wednesday, 24 July 2013

मोहिनी

                  

तुझ्या श्वासांच्या गरम उसासांमध्ये
                          मी हरवून जातो
तुझ्या गालावरची खळी
                मला वेडावून जाते
तुझ्या तरल डोळ्यांतील भाव 
                 मला खुणावत राहतो 
तुझ्या पापण्यांची उघडझाप
               मला मोहूनच टाकते
अशी तू माझ्या मनातील 
             कोपऱ्यात घर करून राहते
अशी तू माझी प्रेरणा होऊन 
                 मला साथ करते
अशी तू लाजरी, अबोल
                 मला नेहमीच मत्रंमुग्ध करते
अशा तुला काय म्हणावे 
                 प्रेरणा , भास, की मोहिनी 
हेच कळेना मला?

Tuesday, 23 July 2013

प्रेम

                   प्रेम

डोक्यातील टिकटिक
हृदयातील धडधड
मनातील कुणकुण 
यालाच म्हणतात वाटतं प्रेम
खोलवर रुजवलेल
तिला पहिले की उसळून येणारं
फेसाळणाऱ्या समुद्रासारखं
अन् अलगद कवेत घेणारं
यालाच म्हणतात वाटतं प्रेम
ती ठेचकाळते
अन् घायाळ मी होतो
ती हसते
 अन्  प्रफुल्लित मी होतो
यालाच म्हणतात वाटतं प्रेम
मी अन् तू , तू अन् मी
 एकच जीव
एकच मन 
आणखी काय हवं
सांग ना?

Monday, 31 December 2012

स्त्री - एक संघर्ष
स्त्री म्हणजे मानिनी
कसली मानिनी?
सतत अपमान झेलणारी
स्त्री म्हणजे दुर्गा 
कधीतरीच रुद्रावतार घेणारी 
स्त्री म्हणजे पुरुषाची ताकद 
त्याची सहधर्मचारिणी 
त्याला सर्वतोपरी साथ देणारी 
पण हीच स्त्री अबला 
सदैव अत्याचार सहन करणारी 
सदैव मर्यादा सांभाळणारी
अन् स्वतःचे मत नसलेली
कर्तुत्वहीन
कणाच हरवलेली
अरे पण वेड्यांनो
याच स्त्रीमुळे तर तुमचा
जन्म झाला
याच स्त्रीमुळे तुमच्या
कर्तुत्वला उजाळा आला
अशा या  स्त्रीचे उदात्तीकरण
करायचे सोडून
तुम्ही तिलाच पायदळी तुडवता
अन् तिची अस्मिता
धुळीस मिळवता
हे बरे नव्हे ?
तिलाही मान द्या
अन् स्वतःचा उत्कर्ष करा

                             मृणाल वाळिंबे

Friday, 14 December 2012

कधी कधी जगताना

कधी कधी जगताना
थोडं  स्वतःसाठी 
अन् खूप सार दुसऱ्यासाठी 
जगण्याचीच येते वेळ 
कधी कधी जगताना 
मनातलं वादळ दूर सारून 
चेहऱ्यावरल हसू ठेवावं
        लागत ठाशीव
कधी कधी जगताना 
कितीही थकवा आला तरी
सदैव प्रसन्न्तेचा मुखवटा
      लागतो जपायला 
कधी कधी जगताना 
आठवणीतले क्षण दूर सारून 
वास्तवातले क्षण लागतात 
       साजरे करायला
कधी कधी जगताना 
आयुष्याच्या जमाखर्चाची 
   भिति बाजूला ठेवून 
ओंजळभर सुखं लागत
दवबिंदूप्रमाणे जपायला




आई - प्रेमळ विश्वास

आई म्हणजे वात्सल्यसिंधू भाव 
आई म्हणजे प्रेमळ जननी 
आई म्हणजे जन्मभराची गुरु 
आई म्हणजे हृदयाची हाक 
आई निःशब्द जाग 
आई गूज अंतरीचे 
आई असते क्षमेची मूर्ती 
आपल्या मुलांचे अपराध 
           पोटात घालणारी 
आई असते सावली 
सतत सोबत करून 
मार्ग दाखवणारी 
आईच असते पाठीराखी 
मुलांची पदोपदी 
अन् तिच निभावते साथ त्यांची 
अर्हनिश , अहोरात्र 
म्हणूनच म्हणतात 
     आईविना भिकारी 
स्वामी तिन्ही जगांचा

Thursday, 29 November 2012

प्रेक्षक

प्रेक्षक असतो साऱ्या 
घटनांचा साक्षीदार 
कधी तो असतो नाट्यगृहात 
नाटकाचा प्रेक्षक म्हणून
कधी तो असतो सिनेमागृहात
चित्रपटाचा प्रेक्षक म्हणून 
कधी तो असतो स्वतःच्याच घरात 
दूरचित्रवणीचा प्रेक्षक म्हणून
कधी कधी तर तो असतो 
स्वतःच्याच छबीत 
बरे वाईट प्रसंग बघत 
स्वतःच्याच मनात
आत्मपरिक्षण करत
खरे तर आपण सारेच
आहोत प्रेक्षक  या अवनीवरती 
अन् बघत आहोत एक एक
विधात्याचा खेळ
कधी हसत, कधी टाळ्या वाजवत
तर कधी रडत , कधी दुःख करत
आपली आपली भूमिका 
पार पडत