Thursday, 20 April 2017

नातं

नात्याला हवं 
समजुतीचं कोंदण 
आपुलकीचं लिंपण 
नको शब्दांचा मारा 
असावा भावनांचा  ओलावा 
हवा प्रेमाचा पाझर 
नको तक्रारीचा सूर 
असावा आरसपानी विश्वास 
नसावी अवास्तव अपेक्षा 
असावा खेळकरपणा 
नसावी चढाओढीची भिंत 
असावी प्रेमाची किनार 
नसावं कुठलं बंधनं 
असावी हळुवारतेची फुंकर 
नसावं तडजोडीचं लेबल 
नातं असावं 
स्वच्छ नितळ पाण्यासमान 
कुणातही मिसळून 
एकजन्य होईल असं 
असावं घट्ट दृढ अभेद्य 
सहज न तुटणारं जसं 
म्हणूनच म्हणते 
जाणा नात्यांची महती 
हातातून वेळ  
निसण्याआधी 

मृणाल वाळिंबे  

शब्द

शब्दांनीच शिकवलयं 
हसायला 
शब्दांनीच शिकवलयं 
लिहायला 
शब्दांनीच घडवलयं 
मला 
शब्दांनीच दिलायं 
आधार मला 
शब्दच तर करतात 
माझी साथ संगत 
शब्दच सखा 
शब्दच माझा कर्ता करविता 
शब्दांची गुंफण 
हिच तर माझी खरी ओळख 
हरवून जाते मी 
या शब्दांच्या दुनियेत 
अन् लेखणी उतरवत जाते 
माझ्या मनातील तगमग 
हे शब्दच घालतात 
कधी तरी घाव 
अन् होऊन जातो 
रंगाचा बेरंग 
म्हणूनच म्हणते 
करा उधळण शब्दांची 
मोत्यासमान 
पण असू द्या भान 
आशयाचं 

मृणाल वाळिंबे  

मैत्रिणी



मैत्रिणी 

मैत्रिणी माझ्या जिवाभावाच्या 
जीवाला जीव देणाऱ्या 
मनाच्या तळातून प्रेम करणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या जिव्हाळ्याच्या 
कुणाच्याही दु:खाने 
कावऱ्याबावऱ्या होणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या मायेच्या 
सदैव आईच्या तोडीने 
पाठीवरून हात फिरवणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या आपुलकीच्या 
हाकेला प्रतिसाद देणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या मनकवड्या 
मनातील भाव 
ओठावर येण्याआधीच जाणणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या प्रेमाच्या 
अत:पासून अंतापर्यंत 
प्रेम करणाऱ्या 
मैत्रिणी माझ्या आयुष्यभराच्या 
सदैव माझी साथ देणाऱ्या 
 माझ्या जीवनाचा 
अविभाज्य घटक असणाऱ्या 
आणखी काय म्हणू 
मैत्रिणी माझ्या एकाच 
नाळेने बांधलेल्या 
जणू काही माझीच छबी 
असलेल्या 

मृणाल वाळिंबे